
अकोला : पावसाळा तोंडावर; उपाययोजना कागदावर
अकोला: उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळांपासून दिलासा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी मंजुर केलेल्या पाणीटंंचाई निवारणाच्या ५० उपाययोजनांपैकी केवळ २१ उपाययोजनांची कामे मंजूर झाली आहेत. २८ कामे प्रगतीपथावर असल्याचा दावा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केला आहे. म्हणजेच मंजूर उपाययोजनांपैकी अद्याप निम्म्या उपाययोजना प्रत्यक्षात पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे टंंचाई निवारणाची कामे कागदावरच असून पावसाळा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांना पाणी मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या जिल्ह्यात सर्वत्र सूर्य आग ओकत आहे. त्यातच ग्रामीण भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ग्रामीणांना उन्हाळ्यात पिण्यासाठी सहज पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील १८० गावांत पाणीटंचाईची स्थिती असल्याचे प्रस्तावित केले हाेते. या गावांतील नागरिकांसाठी १९२ उपाययाेजना सुद्धा प्रस्तावित केल्या. प्रस्तावित उपाययाेजनांपैकी जिल्हाधिकाऱ्यांनी ५० गावांसाठी ५० उपयायाेजनांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. उन्हाळ्याला संपायला जेमतेम दिवस शिल्लक असल्यानंतर सुद्धा अद्याप मंजुरी प्राप्त उपाययोजना अपूर्ण असल्याने टंचाई निवारणाच्या कामात यंत्रणांची अनास्था असल्याचे दिसून येत आहे.अशी आहे स्थिती
विहिर अधिग्रहणच्या १९ उपाययोजना जिल्हाधिकारी यांनी मंजूर केल्या आहेत. त्यापैकी केवळ पाचच पूर्ण झाल्या आहेत, तर १४ प्रगतीपथावर असल्याचा दावा आहे.कुपनलिका घेण्याच्या १० उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी चार पूर्ण झाल्या आहेत, तर सहा प्रगतीपथावर आहेत.
नळ योजना विशेष दुरूस्तीच्या सहा उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी केवळ एकच पूर्ण झाली असून चार प्रगतीपथावर आहेत.
तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या सहा उपाययोजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी केवळ दोनच पूर्ण झाल्या आहेत, तर चार प्रगतीपथावर असल्याचा दावा करण्यात येत आहे.
उपाध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा
पातूर तालुक्यातील पाणी टंंचाईच्या पूरक आराखड्यातील गावांना मंजुरी देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सावित्री राठोड यांनी मंगळवारी (ता. २४) जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट घेतली. यावेळी उपाध्यक्षांनी तालुक्यातील रामनगर व चोंढी धरण या गावामध्ये पाणी टंंचाई असल्याने रामनगर येथे विहिर अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू करण्याची विनंती केली आहे. याव्यतिरिक्त उपाध्यक्षांनी आलेगाव-नवेगाव नळ योजना तथा देऊळगाव-पास्टुल नळ दुरूस्ती योजना तत्काळ कार्यान्वित करण्याची मागणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
Web Title: Akola Rainy Face Measures Paper
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..