...अन् चंद्रावरच्या रस्त्यावर पडले डांबर!

अनुप ताले
शनिवार, 11 जुलै 2020

शहरातून निघून कौलखेड, खडकी, कान्हेरी मार्गे वाशीम जिल्ह्याला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. अकोला-बार्शीटाकळी, अकोला-कारंजा, अकोला-मंगरुळपीर या दाट लोकवस्तीच्या व मोठ्या प्रमाणात वाहतूक असणाऱ्या तालुक्यांना हा मार्ग जोडतो. परंतु, या मार्गाची अतिशय दूरदशा झाली होती. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले होते. परंतु, या मार्गाचे योग्यप्रकारे डांबरीकरण किंवा दुरुस्ती करण्याची तसदी प्रशासनाने घेतली नव्हती.

 

अकोला : अकोला-बार्शीटाकळी-कारंजा-मंगरुळपीर या चार तालुक्यांना आणि अकोला-वाशीम या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे, उपहासाने या मार्गाचा ‘चंद्रावरचा रस्ता’ असा उल्लेख होऊ लागला होता. ‘दैनिक सकाळ’ हा विषय सातत्याने लावून धरला होता. या पाठपुराव्याला आता यश आले असून, या मार्गाचे काम सुरू झाले आहे आणि अखेर चंद्रावरच्या रस्त्यावर डांबर पडल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.

शहरातून निघून कौलखेड, खडकी, कान्हेरी मार्गे वाशीम जिल्ह्याला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. अकोला-बार्शीटाकळी, अकोला-कारंजा, अकोला-मंगरुळपीर या दाट लोकवस्तीच्या व मोठ्या प्रमाणात वाहतूक असणाऱ्या तालुक्यांना हा मार्ग जोडतो. परंतु, या मार्गाची अतिशय दूरदशा झाली होती. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले होते. परंतु, या मार्गाचे योग्यप्रकारे डांबरीकरण किंवा दुरुस्ती करण्याची तसदी प्रशासनाने घेतली नव्हती. याबाबत ‘दैनिक सकाळ’ने प्रश्‍न लावून धरला होता तसेच खडकी येथील जनआधार संघटनेचे डॉ.प्रकाश गोंड व ऋषभ काळे यांनी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदने देऊन या मार्गाचे डांबरीकरण व दर्जात्मक दुरुस्ती करण्याची सातत्याने मागणी सुद्धा केली होती. अखेर सकाळ व संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले असून, या मार्गाची निर्मिती सुरू झाली आहे.

 


चार तालुक्यांना जोडणाऱ्या या मुख्र्य रस्त्याची झालेली दूरदशा सकाळने वृत्त प्रकाशित करुन मांडली होती व या विषयाला वाचा फोडली होती.  

पालकमंत्र्यांनी दिले होते आश्‍वासन
सार्वजनिक बांधकाम विभागाने हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हस्तांतरीत केला होता. त्यामुळे या मार्गाची जबाबदारी त्यांची नसल्याचे सार्वजनिक विभागाचे अधिकारी सांगत होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुद्धा याबाबत जबाबदारी नाकारत होते. त्यामुळे दोन वर्षापासून या रस्त्याची दूरदशा होऊन, हा मार्ग धोक्याचा ठरत असल्याचे ‘सकाळ’ने पालकमंत्री बच्चू कडू यांचेशी बोलताना लक्षात आणून दिले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सुद्धा लवकरच हा प्रश्‍न निकाली लावण्याचे आश्‍वासन ‘सकाळ’ला दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Road construction started, it is connected to washim district