
'शिष्यवृत्तीसाठी' विद्यार्थ्यांना हेलपाटे!
अकोला : सन् २०२१-२२ चे शैक्षणिक सत्र संपायला जेमतेम दिवस शिल्लक असतानाच महाविद्यालयांच्या वेळकाढूपणामुळे विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्जातील त्रुटी, विद्यालय-महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचा दावा समाज कल्याण विभाग करत आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांमध्ये मात्र शिष्यवृत्ती न मिळाल्याने चिंतेचे वातावरण आहे.
शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने विद्यालय व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एससी, व्हिजेएनटी, ओबीसी, एसबीसी व मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांमार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी सुद्धा जिल्ह्यातील नव्याने प्रवेशित व रिनीव्हल विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व फ्री-शिपसाठी अर्ज केले होते. त्यापैकी काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असला तरी शैक्षणिक सत्र संपायला जेमतेम दिवस शिल्लस असल्यानंतर सुद्धा सन् २०२१-२२ वर्षाच्या ४ हजार २२५ विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. काही विद्यार्थ्यांना फ्री-शिपच्या रक्कमेची सुद्धा प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वास्तव आहे. संबंधित विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने त्यांना अडचणींना सामाेरे जावे लागत आहे.
अशी आहे शिष्यवृत्तीची स्थिती
माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन् २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील महाडिबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील नवीन व नुतनीकरणाच्या योजनांचे अर्ज भरण्याची सुविधा १४ डिसेंबर २०२१ पासून उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच वेळोवेळी शासनामार्फत शिष्यवृत्ती आवेदन पत्रे नोंदणीकृत करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. या अनुषंगाने जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील १७ हजार ५४२ तर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील २५ हजार ८६७ आवेदन पत्रे नोंदणीकृत झालेली आहेत.
नोंदणीकृत झालेल्या अर्जांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील १३ हजार ७५० तर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील २१ हजार ७५८ स्तरावरून निकाली काढण्यात आले आहेत. परंतु अद्यापही महाविद्यालयस्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील १ हजार ९९५ तर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील २ हजार २६० शिष्यवृत्ती आवेदनपत्रे असे ४ हजार २५५ आवेदन पत्रे विविध महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. याकरीता वेळोवेळी संबंधित महाविद्यालयांना विविध माध्यमांद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
Web Title: Akola Students Worried About Not Getting Scholarship
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..