
अकाेला : गोठ्याला आग; तीन गायींचा होरपाळून मृत्यू
वणी वारुळा : येथून जवळच असलेल्या देवरी गावानजीक शेतात बांधलेल्या गोठ्याला भीषण आग लागली. या आगीत तीन गाईंचा हेरपाळून मृत्यू झाला. यासह कुटार व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वणी वारुळा येथून जवळच असलेल्या देवरी गावाजवळ पांडुरंग श्रीपद वडणे यांचे शेत आहे. शेतामध्ये वडणे यांनी जनावरे बांधण्यासाठी, तसेच शेतीचे साहित्य व जनावरांचा चारा ठेवण्यासाठी गोठा बांधला. गोठ्यात तीन गाई, कुटार व शेती उपयोगी साहित्य ठेवलेले होते. सोमवारी दुपारी अचानक गोठ्याला आग लागली.
अचानकच लागलेल्या आगीमुळे गोठ्यातील गाईंनाही सोडता आले नसल्याचे त्यांचा आगीत हेरपाळून मृत्यू झाला. तीन गाईंची अंदाजे किंमत एक लाख ५० हजार रुपये, कडबा व कुटार अंदाजे किंमत ७५ हजार रुपये, शेतीचे साहित्य अंदाजे किंमत ५० हजार रुपये व इतर साहित्य एक लाख रुपये, असा जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्याकडून व्यक्त केला जात आहे.
अकोटातील अग्निशमन दलाचे वाहन नादुरुस्त असल्याने तेल्हारा नगरपरिषद अग्निशामक विभागाच्या वाहनाला घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्याच प्रयत्नामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले. घटनास्थळी तहसीलदारांनी भेट दिली. शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
अकोटातील अग्निशमन दल ‘फेल’
गोठ्याला आग लागल्याने घटनेची माहिती अकोट नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला सांगण्यात आली. परंतु, अग्निशमन विभागातील वाहनाचे ‘ब्रेक फेल’ असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगीतले. त्यामुळे अत्यावश्यक घटनेच्या वेळीही अकोट अग्निशमन विभाग ‘फेल’ असल्याचे दिसून येते.
Web Title: Akola Three Cows Death In Barn Fire Farmer Loss
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..