
Akola : अवकाळी पावसाचा नऊ हजार २६८ हेक्टरला फटका
अकोला : जिल्ह्यात सात ते नऊ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसासह गारपिट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या गहू पिकाचे नुकसान झाले. कांद्याला सुद्धा अवकाळीचा फटका बसला. फळ बागांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे तलाठी,
ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांमार्फत पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्यानुसार तीन दिवस झालेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे १६ कोटी ५५ लाख ७ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान प्रचंड पाऊस झाला हाेता. परिणामी खरीप हंगामातील उत्पादन प्रचंड घटले हाेते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाचाही पिकांना फटका बसला हाेता. खरीप हंगामातील नुकसान रब्बी हंगामात काढण्यासाठी शेतकरी कामाला लागला हाेता. मात्र मार्च महिन्यात ६ व ७ मार्च ९ आणि १५ ते १९ मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे फळबागा व रब्बी हंगामातील गव्हासह अन्य पिकांचे नुकसान झाले हाेते.
त्यानंतर एप्रिल महिन्यात सुद्धा अवकाळी पावसाने झोडपले. गारपिटीसह जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. रब्बी हंगामात हाता तोंडाशी येणारा घास पावसाने हिरावला. फळ बागांना सुद्धा अवकाळीचा मोठा फटका बसला.
त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्यात आले. त्यानुसार अवकाळी पावसाचा ९ हजार २६८.६८ हेक्टरला फटका बसला असून शेतकऱ्यांचे १६ कोटी ५५ लाख ७ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. सदर अहवालानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे मदत निधीची मागणी करण्यात आली आहे.
या पिकांचे झाले नुकसान
गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर व पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला. या पाचही तालुक्यातील पपई, केळी, लिंबू, आंबा, संत्रा, डाळिंब ही फळ पिके बाधित झाली. त्यासोबतच गहू, ज्वारी, हरबरा, भुईमुग, भाजीपाला, कांदा, मूग, मका, टरबुज व इतर बागायती पिकांना अवकाळीचा फटका बसला.
असे झाले नुकसान
अवकाळीमुळे बाधित झालेली गावे - ७०७
नुकसानग्रस्त शेतकरी संख्या - १५ हजार ३७१
एकूण बाधित क्षेत्र - ९ हजार २६८.६८
अपेक्षित निधी - १६ कोटी ५५ लाख ७ हजार ८००
तालुकानिहाय नुकसान तालुका क्षेत्र (हेक्टरमध्ये)
बाळापूर ३०५४.३२
अकोला २०८५.६
पातूर २००२.३५
बार्शीटाकळी १७८८.९१
मूर्तिजापूर ३३७.५