
Akola : कुळी पंढरीचा नेम। मुखी सदा नाम विठोबाचे।।
अकोला : कुळी पंढरीचा नेम। मुखी सदा नाम विठोबाचे।। असे म्हणत हजारो वैष्णव भगव्या पताका उंचावत अकोला शहरातून पंढरीकडे मार्गस्थ झाले. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव आणि पातूर येथे पुढील दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी राहणार असून, त्यानंतर वाशीम जिल्ह्यात प्रवेश करेल. अकोला शहरातील दोन दिवसांच्या सेवाभावाने श्रींच्या पालखीतील वारकरी भारावून गेले.
श्री संत गजानन महाराज श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूर पालखी सोहळ रवाना झाल्यानंतर वारकऱ्यांचा अकोला शहरात रविवार व सोमवार असे दोन दिवस मुक्काम होता. या दोन दिवसात अकोला शहरातील भाविकांनी पालखीचे भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत केले. दोन दिवसांतील अकोलेकरांच्या सेवेने वारकरी भारावून गेले. वारत सहभागी ७०० पेक्षा अधिक वारकरी व सेवेकरांना मंगळवारी सकाळी अकोला शहरातून निरोप देण्यात आला.
सुखालागी करीसी तळमळ ।
तरी तु पंढरीसी जाय एक वेळ ।।
मग तु अवघासी सुखरुप होसी ।
जन्मोजन्मी चे दुःख विसरसी ।।
या संत नामदेव महाराजांच्या ओळीप्रमाणे शेगाव येथून निघालेल्या श्रींच्या पंढरपूर वारीचा सोहळा बघून अकोलेकरही भारावून गेले. मंगळवारी पालखी सोहळा गोरेगाव, भरतपूर मार्गे बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे विसावला. बुधवारी सकाळीच पालखी सोहळा पातूरकडे रवाना होईल. त्यानंतर गुरुवारी पालखी वाशीम जिल्ह्यात प्रवेश करेल.
वारकऱ्यांसोबत मुक्या प्राण्यांचीही सेवा
वारीत सहभागी झालेल्या ७०० वारकरी व श्री गजानन महाराज संस्थान शेगावचे सेवेकरी यांच्या सेवेत अकोलेकर रमणून गेले होते. दोन दिवस केवळ वारकऱ्यांचीच नव्हे तर वारीत सहभागी असलेल्या मुक्या प्राण्यांचीही अकोलेकरांनी मनोभावे सेवा केली. पालखी सोहळ्यासोबत दोन अश्व असून, या अश्वांना भाविकांनी खाद्य दिले.