खाबूगिरीची गटारगंगा शिरली दुकानात, भूमिगत गटार योजनेचा ताप सुरू

राम चौधरी 
Friday, 31 July 2020

वाशीम शहराच्या मानगुटीवर जाणीवपूर्वक बसविलेले भूत म्हणून भूमिगत गटार योजनेची ख्याती आहे. मिशनबाजीच्या या गटार योजनेची गटारगंगा चक्क दुकानांमधे शिरल्याने व्यावसायीकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री (ता.२९) झालेल्या अल्प पावसाने या योजनेचे व या योजनेच्या शिल्पकाराच्या तथाकथीत स्वच्छ शहराच्या संकल्पनेचे वस्त्रहरण सुरू झाले आहे.

वाशीम ः वाशीम शहराच्या मानगुटीवर जाणीवपूर्वक बसविलेले भूत म्हणून भूमिगत गटार योजनेची ख्याती आहे. मिशनबाजीच्या या गटार योजनेची गटारगंगा चक्क दुकानांमधे शिरल्याने व्यावसायीकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री (ता.२९) झालेल्या अल्प पावसाने या योजनेचे व या योजनेच्या शिल्पकाराच्या तथाकथीत स्वच्छ शहराच्या संकल्पनेचे वस्त्रहरण सुरू झाले आहे.

सन २०१४ मधे वाशीम शहरात गरज नसताना भूमिगत गटार योजना राबविली. राज्यात अनेक नगर पालिका हद्दीत ही योजना सपशेल नापास ठरली असताना कंत्राटदारीचा कळप सांभाळणाऱ्या तत्कालीन पुढार्याने ही योजना शहराच्या माथी मारली. कारण ही योजना ज्या शहरात राबविली जाईल त्या शहरातील रस्त्यासाठी तब्बल दीडशे कोटी रुपये रस्ते अनुदान मिळत होते. या दिडशे कोटीत कितीतरी कंत्राटदाराला आपल्या भोवती पिंगा घालायला लावता येईल या मानसिकतेतून शहर खोदले पाईप टाकले चेंबर बसविले आपल्या खाजगी मालमत्तेत ही योजना वळवून याची लांबी वाढविली ऐवढे करूनही शहरातील नाल्या जैसेथेच राहील्या.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आमदार लखन मलिक यांनी या योजनेची थेट तक्रार करूनही चौकशीचे केवळ सोपस्कार पार पडले. तब्बल चार वर्ष नागरीकांना चिखलस्नानाची पर्वणी, तिनशे कोटीच्या रस्त्याची वासलात लावल्यानंतर आता हे काम पुर्ण झाल्याचा रिपोर्ट तयार केला गेला मात्र कागदावरचा अहवाल कुचकामी ठरला आहे. बुधवारी रात्री वाशीम शहरात २५ मिलिमीटर पाऊस झाला. महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ असलेला चेबर बंद झाला नालीचे पाणी चेबरमधे न गेल्याने हे पाणी येथील व्यापारी संकूलाच्या तळमजल्यात शिरले. रात्रभर पाण्याने मुक्कामच ठोकला. सकाळी व्यावसायीक आल्यानंतर लाखोंचा माल भूमिगत गटार योजनेच्या गटारगंगेत गटांगळ्या खात असल्याचे चित्र दिसले. नगर पालिका प्रशासनाच्या वतीने आता पाणी उपसणे सुरू आहे. गटाराच्या चेंबरमधून पाणी जाते कि नाही याचा पालिकेलाच पत्ता नसल्याने हे पाणी नाल्यात सोडणे सुरू आहे.

कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची गरज ः आमदार मलिक
वाशीम शहरामधे गरज नसताना भूमिगत गटार योजना राबविली मात्र कंत्राटदाराने काम व्यवस्थीत केले नाही परिणामी शहरामधे अनेक ठिकाणी ही भूमिगत गटार योजना नागरीकांना ताप ठरत आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होवून संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची गरज आहे. तसेच तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया वाशीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार लखन मलिक यांनी दिली आहे.

महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ काय समस्या निर्माण झाली याबाबत माहीती घेण्यात येत आहे पाणी उपसण्यासाठी पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी गेले आहेत. चेंबर बंद झाला असल्यास तो मोकळा करण्यात येईल.
- विजय घोगरे, अभियंता, वाशीम नगर परिषद
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Washim Corruption Gutter Ganga Shirley Shop, Underground Sewer Scheme Fever Begins