वाशीम जिल्ह्यात संसर्ग वाढला,  दोन दिवसात ५५३ बाधित

 Akola Washim News Corona infection increased, 553 infected in two days
Akola Washim News Corona infection increased, 553 infected in two days

वाशीम  : मागील वर्षी चोर पावलाने दाखल झालेल्या कोरोना संसर्गाने सर्वत्र हाहाकार माजविला. दरम्यान, मागील तीन महिन्यांपासून या आजारावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. परंतु, या जीवघेण्या आजाराने पुन्हा डोकेवर काढले असून, मागील दहा दिवसांत नऊशेवर रुग्ण कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले, तर एकाचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना दरदिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाण्याची धास्ती जिल्हावसियांमध्ये आहे.


गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. परिणामी, अर्थचक्र पुन्हा गतीमान होवून जनजीवन पूर्वपदावर येवू लागले होते.  अशातच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोना संसर्गात झपाट्याने वाढ होवू लागली. मागील दहा दिवसात कोरोनाचा प्रकोप कमालीचा वाढला असून, दरदिवशी ही संख्या पटीने वाढू लागल्याचे चित्र समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने १५ फेब्रुवारीला केवळ पाच रुग्ण आढळून आले.

यानंतर ही संख्या वाढीस लागून १६ फेब्रुवारीला ३४, १७ ला ४३, १८ ला ४१, १९ ला ९८, २० ला ९३, २१ ला १२५, २२ ला ६२, २३ ला ८७ तर २४ फेब्रुवारीला सर्वाधिक ३१८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. पुन्हा गुरुवारी (ता.२५) २३५ जण बाधित आढळले. या दहा दिवसात ही रुग्ण संख्या बाराशेच्या उंबरठ्यावर येवून पोहचली आहे. दरम्यानच्या काळात  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जमावबंदी व सायंकाळी पाच नंतर संचारबंदीचा निर्णय घेतला. वाढती रुग्ण संख्या लक्षात जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा सपाटा सुरू केला आहे.

तरीही मागील काही  दिवसात विनामास्क प्रवास करणाऱ्या तब्बल एक हजार २०० वर वाहनधारकांवर कारवाई करत लाखमोलाचा दंड वसूल केला. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवरही निर्बंध आणले असून, आतापर्यंत सहा मंगल कार्यालयाच्या संचालनकांवर प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. ग्रामीण भागातही स्थानिक स्वराज्य संस्थेकडून उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. गावागावांमध्ये दवंडी देत नागरिकांना कोरोना विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे  रस्त्यावरची गर्दी ओसरली असली, तरी रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. दरदिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्यने  आगामी काळात पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाण्याची शक्यता बळावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
------------------------------
सार्वजनिक कार्यक्रमाला बसला आळा
गत आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले. शिवाय सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी, तर या नंतर संचारबंदी लागू केली. प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कारवायांचा धसका घेतल्याने सार्वजनिक कार्यक्रमांस आळा बसला आहे. आता ग्रामीण भागात केवळ पाच ते दहा लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम आटोपल्या जात असल्याचे चित्र आहे.
--------------------------
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह ः ८२४०
ऍक्टिव्ह ः ११२५
डिस्चार्ज ः ७१९२
मृत्यू ः १५७
-------------------------
पोहरादेवीत कोरोनाच उद्रेक
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले. परंतु, वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी या नियमांचे उल्लंघन केल्याची घटना मंगळवारी (ता.२३) घडली. यानंतर आता पोहरादेवीतही कोरोनाचा उद्रेक वाढल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोहरादेवी येथील महंतासह त्यांच्या कुटुंबातील चार तर इतर तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने नागरिकांमध्यें भीतीचे वातावरण पसरले आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com