कोरोनानंतर पावसाळ्यात असे रोखणार जलजन्य आजार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

पावसाळ्यात दूषित पाणी पिल्यास नागरिकांना जलजन्य व इतर साथीचे रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी साथ रोगाच्या व जलजन्य रोगाच्या रोखथामासाठी पूर्व पावसाळी अभियान राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.

अकोला : पावसाळ्यात दूषित पाणी पिल्यास नागरिकांना जलजन्य व इतर साथीचे रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी साथ रोगाच्या व जलजन्य रोगाच्या रोखथामासाठी पूर्व पावसाळी अभियान राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.

ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. असे असले तरी काही ग्रामपंचायतींद्वारे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना, लघु पाणीपुरवठा योजना, विहीर आणि हात पंपाद्वारे ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याच्या योजना राबविण्यात येतात. परंतु पावसाळ्याच्या दिवसात सदर योजनांची देखभाल, दुरुस्ती योग्यप्रकारे होत नाही.

परिणामी ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जलजन्य व साथरोग सुद्धा वाढू शकतात, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना पावसाळ्यापूर्वी देखभाल, दुरुस्तीसाठी विशेष अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायतींनी पावसाळ्यापूर्वी सदर अभियान राबवावे यासाठी बीडीओंना सुद्धा पत्र लिहून ग्रामपंचायतींना त्यादृष्टीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या आहेत सूचना
० ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपुरवठा योजनांचा उद्धव विहीर असल्यास व विहिरींचे कठडे नादुरुस्त असल्यास ते तातडीने दुरुस्त करण्यात यावी. जेणेकरून पावसाचे, पुराचे घाण पाणी विहिरीत शिरून विहिरीचे पाणी दूषित होणार नाही.
० योजनेचा उद्भव विंधन विहीर, कूपनलिका असल्यास त्या जवळ गावातील सांडपाणी, पुराचे पाणी साचून उद्भवाचे पाणी दूषित होणार नाही याबाबत काळजी घ्यावी.
० गावातील योजनेच्या पाईप लाईन वरील गळत्या वेळीच दुरुस्त करण्यात याव्यात. नदी-नाला व सांडपाण्याच्या नाणी मधून जाणार्‍या पाइपलाइनची गळत्या विशेष खबरदारी घेऊन बंद करण्यात यावी.
० पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेल्या योग्य दर्जाच्या ब्लिचिंग पावडरचा साठा ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध ठेवावा. पिण्याचे योग्य शास्त्रीय पद्धतीने नियमित शुद्धीकरण प्रक्रिया करूनच पाण्याचा पुरवठा करण्यात यावा.
० पाणीपुरवठा योजनेच्या पंपाची नियमित पाहणी करून वेळीच आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी. पाणीपुरवठा योजनेकरिता एक अतिरिक्त पंप संच ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध ठेवावा जेणेकरून पंपामध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठा बंद झाल्यावर ग्रामस्थांना इतर ठिकाणावरून पाणी घेण्याची गरज भासणार नाही. 
० गावातील वितरण व्यवस्थेवर नियमित पडताळणी करून देखभाल, दुरुस्ती करण्यात यावी. लिकेजच्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. 
० योजनेची दुरुस्ती व वीज देयकासाठी ग्रामपंचायतीने पुरेसा निधी उपलब्ध ठेवावा.

जनजागृतीवर भर द्या
दूषित पाणीपुरवठ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत पुरेशी जनजागृती करण्यात यावी. त्यासाठी स्थानिक आठवडी बाजार, बसस्थानके, रेल्वेस्टेशन, बाजारपेठ, धार्मिक व पर्यटन स्थळे, शाळा, महाविद्यालय अशा गर्दीच्या ठिकाणी जनजागृतीसाठी पोस्टर बॅनर व लाऊड स्पीकरद्वारे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या साथ रोगाची माहिती देण्यात यावी, अशा सूचना सुद्धा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतींना केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola zilha parishad suggest work for grampanchayat in rain days