
Zp School Student : अकोला जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी लघुचित्रपटातून झळकणार अमेरिकेत
अकोला - अकोला जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या बार्शीटाकळी पंचायत समितीमधील टाकळी (छबिले) या गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहजसुंदर अभिनयाने नटलेल्या 'गुरु द टीचर' या लघुचित्रपटाची निवड जगातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या ‘एसडब्ल्यूआयएफएफ’ या अमेरिकेतील चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे.
कधी साधा कॕमेरादेखील न पाहिलेल्या या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेने ही किमया साधली असून, १२० देशातील १३ हजार प्रवेशिकांमधून या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या निवडक चित्रपटांमध्ये 'गुरु'ची वर्णी लागली आहे. ‘आम्ही आपल्या असामान्य प्रतिभेने प्रभावित झालो असून, ह्या महोत्सवात आपली कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी उत्सुक आहोत’, असे आयोजकांनी कळवले आहे.
अक्षरदीप कला अकादमी, जागर फाउंडेशन आणि ओॲसिस मल्टिमिडियाची ही निर्मिती असून, प्रा.संतोष हुशे, डॉ.नंदकिशोर चिपडे तसेच शिक्षण विभागाच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या ह्या लघुचित्रपटाचे पटकथालेखन तथा दिग्दर्शन महेंद्र बोरकर यांनी केले आहे. किशोर बळींच्या 'गुरु आयोनि लडका sss' ह्या कादंबरीतील एका प्रसंगावर आधारित पंधरा मिनिटांच्या या लघुचित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका तसेच गीतलेखनही केले आहे.
प्रभात किड्सचा विद्यार्थी सृजन बळी तसेच स्कूल आॕफ स्कॉलर्सची विद्यार्थिनी पूर्वा बगळेकर या दोन विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, टाकळी (छबिले) या शाळेचे २५ विद्यार्थी तसेच गावकरी यात अभिनय करताना दिसतात.
डॉ. रमेश थोरात, सचिन गिरी, मेघा बुलबुले, पूर्वा बळी, राहुल सुरवाडे, ऐश्वर्या मेहरे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या लघुचित्रपटात असून, चित्रदिग्दर्शन आणि संकलन विश्वास साठे यांचे आहे. डॉ. कुणाल इंगळे यांनी संगीतबद्ध केलेली प्रार्थना ख्यातनाम गायिका वैशाली माडे यांनी गायली आहे.
संगीत संयोजन बंटी चहारे यांनी, रंगभूषा प्रवीण इंगळे यांनी केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील उत्कट भावबंधाचे दर्शन घडवणाऱ्या या लघुचित्रपटातून दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. अकोल्याचे नाव जागतिक पातळीवर नेणाऱ्या या निवडीमुळे स्वाभाविकच या कलाकृतीबद्दलचे औत्सुक्य वाढले आहे.
कुठलेही व्यावसायिक प्रशिक्षण न घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुलांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाणे ही गोष्टच खूप आशादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीतून तळागाळातील प्रतिभा मुख्य प्रवाहात येणं ही इतरांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे. लवकरच यातील काही चेहरे मराठी चित्रपटात झळकतील, असा विश्वास वाटतो.
- डॉ. महेंद्र बोरकर, दिग्दर्शक