Shirdi Nilwande Dam: तीन दिवसांच्या आत निळवंडे कालव्याची चाचणी बंद; 'हे' मोठं कारण आलं समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shirdi Nilwande Dam

Shirdi Nilwande Dam: तीन दिवसांच्या आत निळवंडे कालव्याची चाचणी बंद; 'हे' मोठं कारण आलं समोर

Shirdi Nilwande Dam: त्रेपन्न वर्षे रेंगाळलेल्या निळवंडे प्रकल्पातून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडलेले पाणी अवघ्या त्रेपन्न तासात बंद करावे लागले. शेतांत आणि घरांत पाणी जाऊ लागल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जाण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली.

आमदार किरण लहामटे यांनी घटनास्थळी येऊन शेतकऱ्यांची बाजू घेत अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर चाचणी बंद करण्यात आली. आता या भागात सातशे मीटर अंतरात प्लॅस्टिकचा कागद अंथरूण पुन्हा चाचणी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Akole Nilwande Dam Water leakage test of Nilwande canal stopped )

धरणाच्या भिंतीपासून पहिल्या सात किलोमीटर अंतरातील मेहेंदुरी गावाजवळ डाव्या कालव्याला न थांबणारी गळती लागल्याने ही चाचणी बंद करण्याची नामुष्की ओढवली. गळतीमुळे अकोले तालुक्यातील शेतकरी संतापले तर पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहणारे लाभक्षेत्रातील दुष्काळी टापूतील शेतकरी हिरमुसले.

या भागात कालवा जमीन सपाटीपासून तब्बल चाळीस फूट उंच आहे. स्फोटकांच्या साहाय्याने डोंगर खोदून तो तयार करण्यात आला. त्यामुळे डोंगराच्या पोटात खोल भेगा पडल्या आहेत. कालव्यात सोडलेले हे पाणी या भेगांतून थेट सुमारे चाळीस फूट खाली असलेल्या शेतात आणि घरात जाऊ लागले.

काल काही ठिकाणी कालव्याच्या पात्रात काळी माती टाकून हा पाझर थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. ही गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी संतापले. आमचा कालव्यात पाणी सोडण्यास विरोध नाही. मात्र घरात आणि शेतात पाणी जाऊन नुकसान होणार असेल ते आम्ही कसे सहन करायचे असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

तेवढ्यात आमदार लहामटे तेथे आले. त्यांनी शेतकऱ्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याने अखेर दुपारी दोनच्या सुमारास चाचणी बंद करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली. आता या सातशे मिटर लांबीच्या गळतीच्या अंतरात कालव्याच्या पात्रात प्लॅस्टिक कागद अंथरून चाचणी पुन्हा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मात्र डाव्या कालव्याच्या पंधरा ते सतरा आणि एकवीस ते अठ्ठावीस किलोमीटर अंतरात देखील अशीच स्थिती आहे. त्यामुळे चाचणीच्या वेळी तेथील काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.