अकाेला : अकोटला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

विजेचे खांब उन्मळून पडले; घरांचे नुकसान, विद्युत पुरवठा खंडित
Akot heavy Rain
Akot heavy Rainsakal

अकोट : शहराला शनिवारी दुपारी तीन वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्याचा जोर इतका भयंकर होता की, मोठमोठी वृक्ष उन्मळून पडली, ठिकठिकाणी विजेचे खांब, तारा तुटून पडल्या असून, विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

चार-पाच दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची उकाड्यापासून शनिवारी थोडीफार सुटका झाली, काहीसा थंडावा मिळाला असला, तरी पावसासोबत आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरात खूप नुकसान झाले आहे. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील काही भागात बऱ्याच नागरिकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली असून, यामध्ये परिसरातील नागरिकांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडे जमिनीवर अक्षरशः झोपली आहेत. शहरातील बस स्टँड जवळ एक मोठे झाड पडून एका दुकानाचे नुकसान झाले आहे, तर शहर पोलिस स्टेशन जवळ झाड उन्मळून पडल्यामुळे विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत.

होळकर कॉलनी जवळ विजेचे खांब पडल्यामुळे तारा तुटून पडल्या आहेत. शहरातील बालाजी मार्केटची गॅलरी तुटून पडल्यामुळे दुकानदारांची धांदल उडाली होती. शहरातील बऱ्याच भागात वादळी वाऱ्यामुळे घरांचे नुकसान झाले आहे. शहरातील काही भागात गारपीटही झाली आहे. पावसाचा जोर इतका भयंकर होता की, दोन-चार फुटावराचे काहीच दिसत नव्हते. दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात खरेदीला आलेल्या लोकांची धांदल उडाली. वादळामुळे पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावण्यासाठी अकोट नगरपरिषदेचे अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी पोहोचले असून, झाडांची विल्हेवाट लावण्याचे काम जोरात करण्यात आले.

महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी व पारेषणचे कर्मचारी सुद्धा तत्काळ पोहोचून विद्युत पुरवठा खंडित करून तारा जोडण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू केले. नागरिकांना पावसामुळे दिलासा जरी मिळाला असला, तरी नुकसान मात्र प्रचंड प्रमाणात झाले आहे. आजच्या पावसाने अकोट शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. वृत्त लिहिस्तोवर कुठेही प्राणहानी झाल्याची माहिती मिळाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com