Amravati : डॉक्टरच्या मनमानीमुळे गर्भवतींचा जीव धोक्यात

१०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टरच्या तक्रारीत वाढ
Ambulance
Ambulanceesakal

अचलपूर,अमरावती : महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून नावारूपास आलेल्या १०८ रुग्णवाहिकेतील एका डॉक्टरच्या मनमानी कारभारामुळे चिखलदरा येथील गर्भवती मातांसह बालकांचा जीव धोक्यात आला आहे.

मागील काही महिन्यांपासून रुग्णवाहिकेवरील एक डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करीत असल्याची चर्चा आहे. त्याचाच परिणाम म्हणून रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसून रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याचाच प्रत्यय १४ फेब्रुवारी रोजी दिसून आला.

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली १०८ रुग्णवाहिका ही अत्यावश्यक संदर्भसेवेसाठी वरदान ठरलेली असताना चिखलदरा तालुक्यात हीच सेवा रुग्णांच्या जिवावर उठली आहे. एका डॉक्टरच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना तत्काळ सेवा मिळण्यास अडचण येत आहे. परिणामी रुग्णांना त्याची मोठी झळ सोसावी लागत आहे.

याचा प्रत्यय मागील काही महिन्यात पुन्हा पुन्हा येत आहे. १४ फेब्रुवारी रोजीसुद्धा चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या दोन गर्भवती महिलांसह एका जखमीस पुढील उपचारासाठी अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यासाठी १०८ वर फोन करून आयडी दिली,

मात्र १०८ रुग्णवाहिकेवरील एक डॉक्टर खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करीत होते. त्यामुळे जवळपास एक तास चिखलदरा येथेच रुग्णवाहिका उभी असतानासुद्धा गर्भवती मातांना रुग्णवाहिका मिळाली नाही. इकडे गर्भवती माता वेदनेने ओरडत होती, तर डॉक्टर खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करीत होते.

यापूर्वीसुद्धा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. बराच वेळ होऊन सुद्धा डॉक्टर येत नसल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी मोबाईलवरच रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरल्याने डॉक्टर रुग्णवाहिका घेऊन ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर दोन गरोदर माता आणि एक जखमी असलेल्या रुग्णास रेफर केले. वारंवार घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

१०८ रुग्णवाहिकेला उशीर झाल्याबाबत सदर डॉक्टर विचारले असता त्यांनी गाडी खराब झाल्याची माहिती दिली. यामुळे मात्र रुग्णांना रेफर करण्यास विलंब झाला. सदरची माहिती १०८ रुग्णवाहिकेच्या जिल्हा व्यवस्थापकांना देण्यात येणार आहे.

-डॉ. संजय पवार, वैद्यकीय अधीक्षक,ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com