आज गौरी पूजन : प्राचीन तीनशे वर्ष जुने महालक्ष्मी मातेचे मंदिर, भक्तांच्या हाकेला धावून येणारी माहेरवाशिणी महालक्ष्मी  

पवन बेलसरे
Wednesday, 26 August 2020

अकोट तालुक्यातील पणज गावाने कबड्डी खेळासह केळी उत्पादनासाठी विदर्भात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच बरोबर गावाने एक अध्यात्मिक वेगळेपणा सुद्धा जपला आहे तो म्हणजे येथील प्रसिद्ध, प्राचीन गौरी महालक्ष्मीचे मंदिर.
 

वडाळी देशमुख (जि.अकोला):  अकोट तालुक्यातील पणज गावाने कबड्डी खेळासह केळी उत्पादनासाठी विदर्भात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच बरोबर गावाने एक अध्यात्मिक वेगळेपणा सुद्धा जपला आहे तो म्हणजे येथील प्रसिद्ध, प्राचीन गौरी महालक्ष्मीचे मंदिर.

केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या पणज गावाची ओखळ प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून आहे. गावात शहापूर वाघोडा प्रकल्प असल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. यासह गावात तीनशे वर्ष जुने गौरी महालक्ष्मी मातेचे मंदिर असल्याने गावाला आध्यात्मिक व पौराणिक वारसा सुद्धा प्राप्त झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

येथील महालक्ष्मी मातेच्या पुरातन मंदिरासंदर्भात एक आख्यायिका आहे. त्यानुसार पुरातनकाळी पणज पासून जवळ असलेल्या महागावातील दोन सासुरवाशी बहिणी व आपल्या चिमुकल्या लहान भावाला बैलगाडीत घेऊन वडाळी देशमुख या गावाकडे निघाल्या होत्या.

त्यांनी बैलगाडी वाल्याला मागे न पाहण्यास सांगितले. मात्र गावाजवळील वाहत्या बोर्डी नदीच्या तिराजवळ आल्यानंतर बैलगाडीवाल्याने मागे वळून पाहिले त्याच क्षणी दोन्ही सासरवाशी बहिणी व भाऊ मूर्तीत रूपांतरित झाले व सासुरवाशिणी पणज गावातच कायमच्या माहेरवाशिणी झाल्या, असे भाविक भक्तांकडून सांगितले जाते.

तेव्हापासून पणज गावात जेष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी सतत तीन दिवस भाविक महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी येतात. यासह मंगळवार व शुक्रवारी सुद्धा भाविक श्रद्धने मंदिरात येवून येथे पूजा-अर्चना करतात.

या धार्मिक स्थळावर गावातील तसेच परिसरातील भाविक भक्त व मंदिर यात्रा समिती महाप्रसादाचे आयोजन करते. या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार गावकऱ्यांकडून व परिसरातील गावकऱ्यांकडून १९८० साली करण्यात आला व मंदिरात माता महालक्ष्मीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना १९८५ साली करण्यात आली. लाखो नागरिकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातून दूरवरून येथे दाखल होतात.

पुरातन मंदिर व दीपमाला
गावातील प्राचीन मंदिर परिसरात दीपमाला असून त्याखाली पायविहीर आहे. पाय विहिरीतून यात्रेत भंडारा करायला भांडीकुंडी आपोआप प्राप्त व्हायचे व भंडारा संपल्यानंतर आपोआप विसर्जित व्हायचे. पायविहिरीतील खालच्या पायरीला मोठा साखळी दांड असून खालच्या पायरीवरून भाविक तीर्थ आणायचे, असे काही भाविक सांगतात.

गौरी पूजनाच्या तीन दिवस दिवाळी
गावातील मंदिर महालक्ष्मी मातेचे माहेर असल्याने देशातील एकमेव मंदिर असल्याचा दावा भक्तगण करतात. त्यामुळे परिसरात येणाऱ्या अनेक गावांमधील माहेरी येणारी प्रत्येक सासुरवाशिणी या मंदिरात आवर्जून दर्शनाला येते. गौरी पूजनाच्या तीन दिवस गावामध्ये अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात येते. तसेच नवरात्राचे नऊ दिवस, मंगळवारी भक्ताच्या रांगा व अलोट गर्दी असते.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ancient 300 year old temple of wadali deshmukh Mahalakshmi