930 शेतकऱ्यांवर अन्याय अन्‌ दोन्ही गटातील आमदार धावले मदतीला

अनुप ताले
Thursday, 30 July 2020

कोरोना आणि त्याला रोखण्यासाठी दीर्घ कालावधीपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे आधिच आर्थिक संकटाचा सामना शेतकरी करीत आहेत. त्यातच पीक विमा कंपनी आणि बॅंकेच्या कचाट्यात सापडून शेतकरी पिसला जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या गावातील 930 शेतकरी सुद्धा पीक विमा कंपनी आणि बॅंकेच्या कचाट्यात सापडले असून, त्यांचा पीक विमा मंजूर होऊन सुद्धा लाभाची रक्कम अजूनपर्यंत त्यांना मिळाली नाही. अखेर उपोषणाचा मार्ग त्यांना अवलंबवावा लागला अन्‌ त्याची माहिती कळताच सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या आमदारानी या गावात धाव घेवून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आश्‍वस्त केले.

अकोला : पीक विमा मंजूर झाला परंतु, विम्याचा लाभ मिळालाच नाही. तो मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांचा दरवाजा ठोठावला. परंतु, न्याय मिळाला नाही, अशी व्यथा मांडत केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावातील 930 शेतकरी 27 जुलै रोजी उपोषणाला बसले. याची माहिती मिळताच आमदार अमोल मिटकरी व आमदार रणधिर सावरकर यांनी कौलखेड जहॉंगिरमध्ये पोहचून शेतकऱ्यांना आश्‍वस्त केले आणि शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.

 

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या गावातील व महसूल मंडळातील 930 शेतकरी, पीक विमा मंजूर होऊनही विम्याच्या लाभापासून वंचित' असल्याचे वृत्त दैनिक सकाळ'ने 27 जुलै रोजी प्रकाशित करून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाला वाचा फोडली होती. त्याची दखल घेत, दुसऱ्याच दिवशी आमदार अमोल मिटकरी व आमदार रणधिर सावरकर यांनी कौलखेड जहॉंगिर येथे जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर व विनंतीवरून येथील ग्रामपंचायत सभागृहात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले व आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केले. उपस्थितांपैकी महिला शेतकरी सुनिताताई गावंडे, आशाताई निर्मळ, मिराबाई तायडे यांना निंबू शरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे अकोला जिल्हाप्रमुख सुरेश जोगळे, शेतकरी आंदोलनाचे सेनापती गजानन अमदाबादकर यांचेही मार्गदर्शन झाले. याप्रसंगी गावचे सरपंच प्रदिप तायडे, उपसरपंच विनायक तायडे, श्‍याम राऊत, स्वप्निल काटोडे, कृषी अधिकारी प्रधान साहेब, कृषी सहायक वंदना विल्हेकर उपस्थित होते. मनोज तायडे त्यांनी आंदोलनाची प्रस्तावना मांडली तर, अरविंद तायडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

 

व्याजासहीत रक्कम मिळवून देईल ः आमदार मिटकरी
शेतकऱ्यांच्या पीकविम्याची रक्कम व्याजासहीत वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, तुम्हाला न्याय मिळाला नाही तर, मी सुद्धा तुमच्या आंदोलनात उडी मारेल, असे आश्‍वस्त करीत आमदार अमोल मिटकरी यांनी कौलखेड जहॉंगिर येथे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. शिवाय बँक व विमा कंपनी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असेल तर, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

 

15 दिवसात न्याय मिळवून देऊ ः आमदार सावरकर
पीक विम्याच्या रकमेपासून वंचित सर्व शेतकऱ्यांना येत्या 15 दिवसातच न्याय मिळवून देत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या सहभागातून हा प्रश्‍न निकाली काढू, असे आश्‍वासन अकोला पूर्वचे आमदार रणधिर सावरकर यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले. शिवाय या संदर्भात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी जो काही खर्च येईल तो मी करायला तयार आहे आणि हा प्रश्न निकाली न लागल्यास मी व माझा पक्षही तुमच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And those 930 farmers in Akola suspended the agitation