बच्चू कडूंनी सुचविली आयडिया; म्हणाले कोरोनाला हरवायचे असेल तर...

bacchu kadu akola.JPG
bacchu kadu akola.JPG

अकोला : कोरोना आजाराची साखळी तोडायची असेल तर केवळ शासन, प्रशासकीय यंत्रणांना जबाबदार धरुन चालणार नाही. त्यासाठी सगळ्यांना राजकीय पक्ष, गट-तट बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल. एकजुटीने प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांना साथ देऊ आणि कोरोनाची साखळी मोडून काढू. ही साखळी मोडण्यासाठी आवश्यकता भासल्यास शासनाच्या मान्यतेने 1 ते 6 जून या कालावधीत ‘जनता कर्फ्यू’ म्हणून स्वयंस्फूर्तीने लॉकडाउनही पाळू, असा निर्धार जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केला.

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. 28 सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या भूमिका मांडताना सद्यस्थितीतून बाहेर पडण्यासंदर्भात उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले. त्यानुसार विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भूमिका मांडल्या. त्यात प्रामुख्याने केरळ सारख्या राज्यातील उपाययोजनांच्या अभ्यास करुन त्याप्रमाणे उपाययोजना राबवाव्या, अशी मते मांडण्यात आली. तसेच पुन्हा एकदा काही कालावधीसाठी कडेकोट लॉकडाउन पाळावा, अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या. यावेळी झालेल्या चर्चेत माजी आमदार बबनराव चौधरी, धैर्यवर्धन पुंडकर, बुढन गाडेकर, पंकज साबळे, माजी महापौर विजय अग्रवाल, अरुंधती शिरसाठ, सिद्धार्थ शर्मा, पराग गवई, शाम राऊत, गजानन पुंडकर आदींनी सहभाग घेतला. शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

लोकप्रतिनिधींनी मांडली मतं
० कोरोनाचा शहरी भागातून ग्रामीण भागात शिरकाव होऊ लागला आहे. त्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांना अधिक चांगली आरोग्य सेवा देता यावी यासाठी प्रशासनाने चांगली कामगिरी करावी, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतीभा भोजने यांनी व्यक्त केले. 
० आमदार गोवर्धन शर्मा म्हणाले की, प्रशासनाने लॉकडाउनसह इतर उपाययोजनांची अंमलबजावणी करत असताना लोकप्रतिनिधींची मते विचारात घ्यावीत.
० लोकांनींही दक्षता बाळगावी. ही वेळ एकमेकांच्या उणीवा काढण्याची नसून एकजुटीने काम करण्याची आहे, असे आमदार नितीन देशमुख म्हणाले. 
० आमदार गोपीकिशन बाजोरिया म्हणाले की, कोरोना संसर्गाचे ६६ टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनामुळे लोकांच्या मनात निर्माण झालेली भिती दूर करणे आवश्यक आहे. आपण सारेजण त्यासाठी पक्षभेद विसरुन एकजुटीने प्रयत्न करु.
० रुग्णाचा स्वॅब चाचणी साठी घेतल्यानंतर त्याचा अहवाल येईपर्यंत रुग्णाला क्वारंटाईन करुन ठेवावे. रुग्णांच्या संपर्कातील लोकांनाही क्वारंटाईन करा. पोलिस दलाच्या मदतीला राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांची मदत घ्या, असे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले. 
० आमदार डॉ. रणजित पाटील म्हणाले की, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देऊन संसर्ग फैलावणार नाही यासाठी उपाययोजना राबवाव्या. शेतकऱ्यांसाठी महत्वाचे दिवस आहेत. त्यांची कामे प्राधान्यक्रम ठरवून वेळेत पूर्ण करा.
० आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, नागरिक म्हणून पक्षभेद विसरुन सगळ्यांनी एकत्र येणं महत्त्वाचं आहे.  चाचण्यांची क्षमता वाढवून त्यासाठी लागणारा कालावधी कमी करा. निकाल हातात मिळेपर्यंत लक्षणांनी युक्त व लक्षणे न आढळणारे सर्व रुग्ण एकत्र ठेवू नका त्यांना वेगळे ठेवा.
० जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की, रुग्ण वाढ दुप्पट होण्याचा दर व मृत्यूचा दर रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. आता घरोघरी तपासणीची मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्यात प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com