
Holi Festival 2023 : सिंदखेड तालुक्यामध्ये बंजारा लोकसंस्कृतीने जपले अस्सल होळीचे वेगळेपण
- गजानन काळुसे
सिंदखेडराजा : प्राचीन काळापासून दरी खोऱ्यात वावरणाऱ्या बंजारा समाजाचा इतिहास बंजारा लोकसंस्कृतीतून दिसून येतो होळी व रंगपंचमीच्या उत्सव प्रत्येक समाज वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, परंपरागत होळी सणाला आधुनिकतेचा मुलामा चढवून काही मी त्याचे विकृतीकरण केले आहे.
मात्र बंजारा समाजाची होळी साजरी करण्याची पद्धत अनोखी आणि वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांनी आपली प्राचीन परंपरा अजूनही जोपासली आहे. रंगबेरंगी पारंपरिक वेशभूषा करून स्त्री-पुरुष लहान-थोर होळी भोवती वर्तुळाकार करून नाचतात.
तांड्यावर होळीचे रंग उधळले जातात. होळीच्या या गीतांना ' लेंगी गीत ' असे म्हणतात. होळी नंतरचा लेंगी महोत्सव ही एक सांस्कृतिक पर्वणी असते. डफाच्या तालावर ही पारंपरिक लेंगी गीत गात , नृत्य करीत बंजारा समाजाची होळी वैशिष्ट्यपूर्ण व उत्साहवर्धक असते. लेंगी गीतातून बंजारा समाजाच्या प्रथा रूढी व परंपरा या संस्कृतीचे दर्शन घडते सिंदखेडराजा तालुक्यामध्ये बंजारा समाजाचा मोठ्या प्रमाणावर वास्तवास आहे.
त्यामध्ये तालुक्यातील जयपूर तांडा , पिंपळखेड , ताडशिवणी , वसंत नगर , नसराबाद , गौकुळनगर , बुट्टा , धानोरा , आडगाव राजा , जांभोरा , भोसा, अंचली , लिंगा , झोटीगा , केशव शिवणी, गारखेड यासह अनेक गावांमध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो.
सिंदखेड राजा तालुक्यातील जयपूर तांडा येथे बंजारा समाजाने हा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत त्याचे अस्सलपण पण टिकवून ठेवले आहे. लोककलेचा सुंदर आविष्कार या निमित्ताने तांड्यावर पाहायला मिळतो. जयपूर तांडा येथील लहान व्यक्ती पासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत उत्साहात सामील झालेले होते.
बाहेरगावी गेलेली मंडळीही गावाकडे होळीसाठी गावांमध्ये आलेले दिसून आले. त्यामुळे बंजारा समाजात एकात्मता निर्माण झाल्याचे दर्शन पाहायला मिळाले, समाजाची प्रगती साधण्यासाठी बंजारा समाजाच्या लोककला रूढी आणि परंपरा प्रवाहित राहण्यासाठी होळी उत्सव बंजारा समाज जीवनाचे अंग ठरला आहे.
परंपरेने चालत आलेली लेंगी डफ नगारा अशा वाद्यावर चाललेला लोक समूहाचा नुत्यमय आविष्कार पारंपरिक, वेशभूषा, केशभूषा बंजारा समाजातील आगळेवेगळे आकर्षण ठरते, दरम्यान होळी गीताचे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे महिला व पुरुष सारेच हे गीत एकत्र गातात विशेषता महिला गीत गाताना एकरूप होऊन तन्मयतेने नाचू लागतात.
होळीचे लोक संस्कृती च्या प्रवाहात रीतीरिवाचा मेळ घातला गेला आहे.यावेळी जयपूर तांडा येथील शेकडो महिला पुरुष लेंगी गीता मध्ये सहभागी झाले होते, तर तांडा मधील प्रत्येक घरासमोर बंजारा लेंगी गीत गाऊन लेंगी गीतावर नाचून बंजारा लेंगी गीतांमध्ये महिला व पुरुष रंगून केल्याचे पहायला मिळत होत्या.