Akola : बुलडाणा जिल्हा ठरणार निर्णायक; सर्वाधिक मतदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan-Parishad

बुलडाणा जिल्हा ठरणार निर्णायक; सर्वाधिक मतदार

अकोला : विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा- वाशीम स्थानिक प्राधिकार मतदारसंघासाठीची प्राथमिक मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सर्वाधिक मतदार बुलडाणा जिल्ह्यातील असल्याने या निवडणुकीत बुलडाणा जिल्हा निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आता इच्छुकांचे लक्ष अंतिम मतदार यादीकडे लागले आहे.

विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा- वाशीम स्थानिक प्राधिकार मतदारसंघासाठी येत्या १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तिन्ही जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व जिल्हा परिषद या निवडणुकीत मतदार आहे. त्यानुसार तिन्ही जिल्ह्यातील मतदारांची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यातीवर सात दिवसांत हरकती व आक्षेप नोंदविता येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदारयादी जाहीर केली जाईल.

प्राथमिक मतदार यादीनुसार तिन्ही जिल्ह्यात ८२१ मतदार आहेत. त्यात ३८९ पुरुष आणि ४३२ महिला मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक ३६८ मतदार बुलडाणा जिल्ह्यात आहे. दुसऱ्या क्रमांकावर २८५ मतदार असलेला अकोला जिल्हा असून, वाशीम जिल्ह्यात १६८ मतदार आहेत.

सर्वाधिक मतदार असलेली अकोला महानगरपालिकेत ८१ सदस्य असून, त्यापाठोपाठ ७१ सदस्य बुलडाणा जिल्हा परिषदेत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेसोबत प्रहार या महाविकास आघाडीत असलेल्या पक्षांचे संख्या बळ सर्वाधिक असून, त्यात काँग्रेस व राकाँचे एकत्रित बळ अधिक आहे.

ही संख्या बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक असल्याने महाविकास आघाडीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भाजपला तेवढ्याच क्षमतेचा उमेदवार द्यावा लागणार आहे.

भाजपचा उमेदवार मंगळवारी ठरणार

महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे नाव निश्चित मानले जात आहे. त्यांच्या विरोधात यापूर्वीच्या तिन्ही निवडणुकीत मित्र पक्ष असलेल्या भाजपचा उमेदवार राहणार आहे. सध्या तरी भाजपकडून कोणतेही नाव जाहीर करण्यात आले नाही. येत्या मंगळवार, ता. १६ नोव्हेंबर रोजी अकोला येथे आयोजित बैठकीत भाजपच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

वाशीम जि.प.चे मतदार वाढण्याची शक्यता

वाशीम जिल्हा परिषदेच्या ३४ सदस्यांचाच प्राथमिक मतदार यादीत समावेश आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी जाहीर होताना वाशीम जिल्ह्यातील मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वाशीम नगर परिषदेचे सर्वाधिक ५८ मतदारांचा प्राथमिक यादीत समावेश आहे. याशिवाय कारंजा न.प.चे ३२, मंगरुळपीर न.प.चे २१ आणि रिसोड न.प.चे २३ मतदार आहेत.

loading image
go to top