बुलडाणा : बारदाना संपल्याने हरभरा खरेदीला स्टॉप!

नाफेडच्या खरेदी केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी शेतकर्‍यांनी झुंबड केली
 gram of Nafed
gram of Nafedsakal

मेहकर : शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या गाजावाजा करत आधारभूत किंमतीत शेतमाल खरेदीच्या शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत खरेदी केंद्र उघडले. परंतु, आता जिल्ह्यातील नाफेडच्या 11 खरेदी केंद्रे बारदाना उपलब्ध नाही म्हणून बंद पडली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाने हमी भावात हरभरा खरेदी करण्याची योजना जाहीर करून नाफेड मार्फत खरेदी केंद्रे सुरू केली.

खासगी बाजार पेठेत अथवा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याची व चुकारे विलंबाने मिळत असल्याची शेतकर्‍यांची भावना असल्याने नाफेडच्या खरेदी केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी शेतकर्‍यांनी झुंबड केली. गेल्या 6 दिवसांपासून बारदाना नाही म्हणून नाफेडची जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्रे बंद आहे. रोज नव्याने अनेक शेतकरी सर्व केंद्रांवर नोंदणीसाठी येत आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रात नोंदणी केल्यावर त्यांचा क्रमांक आला की,त्यांना शेतमाल घेऊन येण्याचा मेसेज पाठविला जातो.मेहकर येथील खरेदी विक्री संस्थेच्या केंद्रात 2 हजार 117 शेतकर्‍यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 309 शेतकर्‍यांचा हरभरा विक्री झाला व नंतर बारदान्याअभावी केंद्र बंद पडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

लग्नसराई व खरिपासाठी बी बियाणे ,खते,औषधी खरेदी करणे यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे.यंदाच्या हंगामात हरभरा पिकाचे विक्रमी उत्पन्न आले.आणि आता खरेदी केंद्रे बंद पडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. प्रतिक्विंटल 5 हजार 243 रुपये हरभर्‍याचा हमीभाव नाफेड देत असल्याने शेतकर्‍यांची नाफेडच्या खरेदी केंद्रांना प्रथम पसंती आहे.

मात्र, बारदाना उपलब्ध नाही म्हणून ही खरेदी केंद्रे बंद पडल्याने खरेदी विक्री संस्था शासनाकडे बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहे. शेतकरी संस्थेत चकरा मारून थकले आहेत.ते नाइलाजाने आंदोलनाची भाषा करत आहेत. राज्य मार्केटिंग फेडरेशनने मोठया प्रमाणात बारदाना त्वरित उपलब्ध करून दिला तरच शेतकर्‍यांचा शेतमाल गतीने विक्री केला जाऊ शकेल. 29 मे ही हमीभावाने नाफेडने शेतमाल हरभरा खरेदी करण्याची शेवटची तारीख आहे. केंद्रे बंद पडल्याने शेतकरी हादरले असून ती लवकर सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

आजपर्यंत नाफेड केंद्रावर झालेली हरभरा खरेदी

सिंदखेडराजा 5 हजार 410, बुलडाणा 1 हजार 815, खरेदी विक्री संस्था संग्रामपूर 8 हजार 215, संग्रामपूर क्रमांक दोन येथे 988 क्विंटल, लोणार 4 हजार 645, देऊळगाव राजा 5 हजार 728, शेगाव 14 हजार 186, मेहकर 5 हजार 324, साखरखेर्डा 8 हजार 894 इतकी खरेदी झाली आहे.

14 हजार 429 शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यातील 11 खरेदी केंद्रांवर आजवर 18 हजार शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी केवळ 3 हजार 751 शेतकर्‍यांचा 60 हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून त्याची किंमत 31 कोटी 56 लाख 77हजार 570 रुपये इतकी आहे. अजून 14 हजार 429 शेतकर्‍यांचा शेतमाल विक्री होणे बाकी आहे

विदर्भ सहकारी मार्केटींग फेडरेशनकडे बारदाना तर नाफेड कडे तूट

विदर्भ सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या पाचही केंद्रांवर मुबलक बारदाना उपलब्ध असून ती खरेदी केंद्रे सुरू आहेत. मात्र, राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्ह्यातील खरेदी केंद्रांमध्ये बारदाना उपलब्ध नाही. यामुळे शेतकर्‍यांनी करावे तरी काय असा प्रश्‍न पडला आहे. हमीभाव चांगला असल्याने शेतकर्‍यांचा ओढ नाफेड खरेदी केंद्रांकडे आहे. दीड लाख पोती बारदाना मागणी केली असून तो लवकर मिळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करतो आहे. 25 हजार पोती आज प्राप्त झालीत ती जिल्हाभर वितरित करून केंद्रे सुरू केली जातील.

- पी. एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा.

बारदाना उपलब्ध न होण्याची हीच परिस्थिती राहिली तर शेवटच्या शेतकर्‍याचा शेतमाल आम्ही खरेदी करू शकू की नाही हे सांगणे कठीण झाले आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या मुख्यालयाने त्वरित मुबलक प्रमाणात बारदाना पुरविणे अत्यंत गरजेचे आहे. खरेदी केंद्रे सुरू होण्याआधीच त्यांनी योग्य नियोजन करणे गरजेचे होते. सगळा गलथानपणा असून, आम्ही नाहक शेतकर्‍यांच्या रोषाला जात आहे.

- मधुकरराव रहाटे, सभापती, खरेदी विक्री संस्था, मेहकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com