सामान्यांच्या ताटातून चपाती होणार कमी!

रेशन दुकानातून मिळणाऱ्या गव्हाच्या प्रमाणात कपात
Civil Supplies Department ration shop Reduced Wheat quantity
Civil Supplies Department ration shop Reduced Wheat quantitysakal

अकोला : राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानातून करण्यात येणाऱ्या गव्हाचे वाटप कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरीब लाभार्थ्यांना आता गहू कमी मिळणार असून त्याच्या परिणाम स्वरूप सर्वसामान्यांच्या ताटातून चपाती कमी होऊ शकते. शासनाने लाभार्थ्यांचा गहू वाटपाचे प्रमाण कमी केले असले तरी तांदुळाचे वाटप मात्र वाढवून दिले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाअंतर्गत जिल्ह्यातील हजाराे गाेरगरीबांना अनुदानित दराने धान्याचे वाटप करण्यात येते. त्यामध्ये शहरी व ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लाेकांचा समावेश आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आहेत.

त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील हजारो पात्र रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वाटप करण्यात येते. सदर धान्य हे लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात मिळत असल्याने त्याचा लाभ लाखो लाभार्थ्यांना होतो. अनेक लाभार्थी कुटुंबांचा संपूर्ण उदरनिर्वाह याच धान्यातून होतो. त्यामुळे लाभार्थ्यांच्या जीवनात सवलतीच्या दरातील धान्य वाटपाला अतिशय महत्व आहे. या धान्य वाटपाचे प्रमाण शासनाने निश्चित केले आहे.

त्यानुसार अंत्योदय कार्डधारकांना एका कार्डवर २० किलो गहू व १५ किलो तांदूळ तर प्राधान्य गटातील प्रत्येक लाभार्थ्याला तीन किलो गहू व दोन किलो तांदुळाचे वाटप करण्यात येते. परंतु त्यामध्ये आता शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बदल केला आहे. त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या हिस्स्यातील गव्हाला कात्री लावण्यात आली असून त्याबदल्यात लाभार्थ्यांना तितकाच तांदुळ मिळेल. परिणामस्वरूप लाभार्थ्यांच्या ताटातून गव्हाची चपाती कमी होईल.

उत्पादन घटल्याने वाटपावर कात्री

देशात गव्हाचे उत्पादन घटल्याने भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशात गव्हाचे संकट असल्याने ही बंदी घालण्यात आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सरकारी योजनांसाठीही गहू कमी करण्यात आला असून लाभर्थ्यांना तांदुळाचे वाटप अधिक करण्यात येत आहे. खुल्या बाजारात सुद्धा याचा परिणाम दिसून येणार आहे.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

  • जिल्ह्यात ४४ हजार ७५३ अंत्योदय गटातील कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वाटप करण्यात येते. त्यानुसार यापूर्वी कार्डधारकांना २० किलो गहू व १५ किलो तांदुळाचे वाटप करण्यात येत होते. परंतु यानंतर लाभार्थ्यांना १५ किलो गहू व २० किलो तांदुळाचे वापट करण्यात येईल.

  • जिल्ह्यात प्राध्यान गटात ११ हजार ४ हजार ७८७ लाभार्थी आहेत. त्यांना या आधी प्रति लाभार्थी ३ किलो गहू व २ किलो तांदुळ या प्रमाणात धान्याचे वाटप करण्यात येत होते. परंतु आता त्यात २ किलो गहू व ३ किलो तांदूळ असा बदल करण्यात आला आहे.

  • धान्य वाटपचा सदर बदल जिल्ह्यात जून २०२२ ते मार्च २०२३ पर्यंतच्या काळासाठी लागू राहिल.

    जून महिन्यापासून लाभार्थ्यांना रेशन दुकानातून गव्हाचे वाटप कमी प्रमाणात करण्यात येईल, तर त्याबदल्यात तांदुळ देण्यात येतील. यासंबंधीचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत.

- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com