महागाई विरोधात आजपासून कॉंग्रेसचे जनजागरण अभियान | akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागाई

महागाई विरोधात आजपासून कॉंग्रेसचे जनजागरण अभियान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरित्या महागाई वाढवून देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून महागाई विरोधात राज्यभर जनजागरण अभियान आयोजित करण्यात आले आहे. ता. १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जंयतीपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्राम पातळीपर्यंत हे जनजागरण अभियान प्रारंभ होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व अकोला जिल्ह्याचे प्रभारी दिलीप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जनजागरण अभियानाच्या पहिल्या दिवशी ता.१४ नोव्हेंबर रोजी पदयात्रा काढून महागाई विरोधात जनजागृती करण्यात येईल. ग्रामीण भागातील गाव-खेडयांमध्ये पदयात्रांचे आयोजन करण्यात आले असून, महागाई, गॅस दरवाढ, पेट्रोल-डिझेल दरवाढ या विरोधात फलक तयार करून घोषणाबाजी करण्यात येणार आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगार यांच्या वरील अन्याय, लोकशाहीचे विदृपीकरण, संविधान बचाव आदी मुद्दे घेऊ न शहर व खेडयांमध्ये कॉर्नर मिटींग आयोजित करण्यात येणार आहे. जागरण व गोंधळाच्या माध्यमातून प्रभावीपणे हे मुद्दे लोकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.

हेही वाचा: सावंतवाडी : दुहेरी हत्याकांड प्रकरण सोन्याच्या हव्यासापोटीच

ता.१४ नोव्हेंबर पंडित नेहरू यांची जयंती, ता.१९ नोव्हेंबर इंदिरा गांधी यांची जंयती, ता. २५ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी तर ता. २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे. हे सर्व कार्यक्रम अभियानाच्या ठिकाणी सर्वत्र आयोजित करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत सहप्रभारी नंदकिशोर कुईटे, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. एस. एन. खतीब, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, प्रदेश महासचिव बबनराव चौधरी, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, बाळापूर नगर परिषदेचे अध्यक्ष एनोद्दिन खतीब, प्रदीप वखारिया, कपिल रावदेव, अनंत बगाडे, रवी पाटील अरबट, तश्वर पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमुख नेते ग्रामीण भागात मुक्कामी

या जनजागरण अभियानात जिल्ह्यातील माजी मंत्री, माजी आमदार, ज्येष्ठ नेते, लोकसभा व विधानसभेचे उमेदवार प्रदेश पदाधिकारी यांनी ग्रामीण भागात १० दिवस मुक्कामी राहून जनजागरण अभियानात मार्गदर्शन, सहभाग राहणार आहे.

loading image
go to top