कोरोनाचा उद्रेक थांबेना; हादरे सुरूच

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे रविवारी (ता. 14) पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 22 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एक हजार सात झाली असून कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा 51 झाली आहे. एकाच दिवशी सर्वाधिक पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यात रविवारी (ता. 14) कोरोनाचा बॉम्बच फुटला. 

अकोला : जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे रविवारी (ता. 14) पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 22 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एक हजार सात झाली असून कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा 51 झाली आहे. एकाच दिवशी सर्वाधिक पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यात रविवारी (ता. 14) कोरोनाचा बॉम्बच फुटला. 

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 रोगाने सर्वत्र थैमान घातलं आहे. संसर्गामुळे होणाऱ्या सदर रोगाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय व शासन स्तरावर करण्यात आलेल्या सर्वच उपाययोजना रुग्णांची वाढती संख्या पाहून कमी पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्यात रविवार (ता. 14) पर्यंत एकूण 7 हजार 311 रुग्णांचे नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 7 हजार 9, फेरतपासणीचे 118 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 184 नमुने होते. एकूण नमुन्यांपैकी 7 हजार 259 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात निगेटिव्ह अहवालांची संख्या 6 हजार 252 आहे, तर पॉझिटिव्ह रुग्णांची 1007 आहेत. 

22 रुग्ण आणखी पॉझिटिव्ह 
रविवारी (ता. 14) 22 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 7 महिला व 15 पुरुषांचा समावेश आहे. संबंधित रुग्णांपैकी दोन मोठी उमरी, शंकर नगर येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन, सिंदखेड येथील दोन तर उर्वरित शिवाजीनगर, देवी खदान, गाडगे नगर, नवाबपूरा, खेडेकर नगर, खदान, भांडपूरा, अकोट फ़ैल, तारफ़ैल, गायत्री नगर, गुलजार पुरा, वाडेगाव व बाळापूर येथील रहिवासी आहेत. एक रुग्ण वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपिर येथील असून तो वाशिम जिल्हा रुग्णालयातून संदर्भित आहे. त्याचेवर अकोला येथेच उपचार सुरू आहेत.

कोरोनाचा कहर; एकाच दिवशी पाच बळी
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 रोगाने जिल्ह्यात रविवारी (ता. 14) पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात अकोट फ़ैल येथील 68 वर्षीय महिला असून सदर महिला 3 जून रोजी दाखल झाली होती. शंकर नगर येथील 53 वर्षीय पुरुष 10 जून रोजी दाखल झाला होता. बाळापूर येथील 55 वर्षीय महिला 13 जून रोजी दाखल झाली होती. बापूनगर येथील 58 वर्षीय पुरुष 3 जून रोजी दाखल झाला होता. त्याचा रविवारी (ता. 14) पहाटे मृत्यू झाला. सिंधी कॅम्प येथील 56 वर्षीय पुरुष हा 12 जून रोजी दाखल झाला होता व हा रुग्ण आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona bomb explodes in akola; Five patients died