गव्हाचे पीक उभे अन् डोक्यावर अवकाळी पावसाचे संकट

गहू वाचवायचा कसा?
wheat
wheatfile photo

अकोला ः यंदा गव्हाचे पीक wheat crop जोरदार असून, अजूनही पीक शेतात उभे आहे. काही भागात पीक काढणे सुरू आहे तर, काही ठिकाणी पीक काढायला काही दिवसाचा अवधी बाकी आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, अजूनही पुढील काही दिवस वादळी पावसाची शक्यता कायम असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे बहरलेले गव्हाचे पीक आता वाचवायचे कसे, हा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. Crisis of rains on wheat crop

यावर्षी जिल्ह्यात मॉन्सून लांबल्याने व अतिवृष्टी झाल्याने जमिनीला चांगली ओल मिळाली व रब्बी पिकांसाठी काही प्रमाणात पोषक वातावरण तयार झाले. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात गव्हाचा पेरा सुद्धा वाढला. आवश्‍यकतेनुसार पाणीसाठा उपलब्ध असल्याने गव्हाला मुबलक पाणी मिळून सर्वत्र गव्हाचे पीक डौलदार झाले.

जिल्ह्यात काही भागात लवकर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी गहू काढला असून, त्यांंना एकरी १० ते २० क्विंटल सरासरी उत्पादन मिळाले आहे. परंतु, बहुतांश भागात उशिरा पेरणी झालेले पीक अजूनही शेतातच उभे आहे. काही ठिकाणी पीक काढण्यासाठी तयार आहे. परंतु, याचवेळी पावसाने पुन्हा डोके वर काढले असून, शनिवारी, रविवारी जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाच्या हजेरीसह गारपीट सुद्धा झाली. त्यामुळे गहू, कांदा, लिंबू, आंबा, भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. चिंतेची बाब म्हणजे पुढेही काही दिवस जिल्ह्यासह विदर्भात जोरदार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले असल्याने जिल्ह्यातील गहू उत्पादकांना मोठ्या नुकसानाला यंदाही सामोरे जावे लागू शकते.

सातही तालुक्यात नुकसान

तेल्हारा, अकोट, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व अकोला या सातही तालुक्यात दोन दिवसात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. काही तालुक्यात गारपीट सुद्धा झाली. वादळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोकण विभागा वगळून सर्व विभागात कमी अधिक प्रमाणात वादळी/अवकाळी पावसाची शक्यता दिसून येत आहे. हवेतील वाढलेली आद्रता रात्री उशिरापर्यंत अशा वादळी पावसाच्या प्रणाली करीता मदतगार ठरतं असते.

उपग्रह छायाचित्रानुसार नाशिक, पुणे, सातारा, नगर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, चंद्रपूर, अमरावती (मेळघाट), अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा इत्यादी जिल्ह्यासोबत, मध्यप्रदेश राज्य सीमावर्ती तालुक्यात रविवारी (ता.२१) संध्याकाळपासून वादळी, अवकाळी पावसाची शक्यता दिसून येत असून, पुढील काही दिवस अवकाळी पाऊस राहू शकतो.

- संजय अप्तूरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com