डांबराच्या रस्त्यावरील खड्ड्यांसाठी चक्क सिमेंट कॉन्क्रिटचा मलबा!

विवेक मेतकर
Tuesday, 1 September 2020

राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी मोठे-मोठे खड्डे पडले अाहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. महामार्ग खड्डेमय झाल्याने वाहनधारकांना प्रवास जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे. महामार्गावर खड्ड्यांमूळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र असे असले तरी महामार्गावर एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

अकोला ः अकोला ते मूर्तिजापूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी मोठे-मोठे खड्डे पडले अाहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. महामार्ग खड्डेमय झाल्याने वाहनधारकांना प्रवास जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे. महामार्गावर खड्ड्यांमूळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र असे असले तरी महामार्गावर एक विचित्र प्रकार समोर आला आहे. डांबराच्या रस्त्यावर चक्क सिमेंट कॉन्क्रिटचा मलबा वापरून खड्डे बुजविण्यात येत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

गणेशोत्सव आणि आगामी नवरात्र उत्सवात परिसरातील नागरिका या मार्गाने नवरात्री उत्सवात कुटूंबासह कुरणखेड येथील चंडिका देवीचे, डोंगरगाव येथे अंबा देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील अकोला जवळील शिवणी ते बोरगावमंजू, कुरणखेडपर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे सामान्य वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन त्रास सहन करावा लागत आहे.

अपघात टाळण्यासाठी गत तीन ते चार वर्षापासून महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असले तरी त्याला पूर्ण होण्यास वेळ लागेल. तो पर्यंत अपघात टाळता यावा व वाहनधारकांना कुठलाही त्रास होवू नये यासाठी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणे गरजेचे आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने त्वरित लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

अकोला ते मूर्तिजापूर या डांबरी महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये सिमेंट कॉन्क्रिट भरण्यात येत आहे. एवढेच काय तर सिमेंट आदी मलबा रस्त्यावर इतरत्र पसरत असल्यामुळे दूचाकी वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. यामुळे वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या कामाची चौकशी करून रस्त्याचे गड्डे नियमाप्रमाणे बुजविण्यात यावेत.
- रुपाली सतिशराव गोपनारायण, माजी सदस्या पंजायत समिती, अकोला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danger to Akola-Murtijapur National Highway