मागणी होती 24 ची मिळाले दोनच व्हेंटीलेटर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

अद्यापही 22 व्हेंटीलेटरची प्रतीक्षा

अकोलाः अकोल्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशातच जी उपकरणे या व्यक्तींचा प्राण वाचवितात ते व्हेंटीलेटर सर्वोपचार रुग्णालयाकडे तुटपुंजी आहेत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे व्हेंटीलेटरची मागणी केली होती. मात्र, प्रस्तावित 24 व्हेंटीलेटरपैकी दोनच व्हेंटीलेटर सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाली असून, अद्यापही 22 व्हेंटीलेटरची प्रतीक्षा कायम आहे.

सध्या जिल्ह्यावर कोरोनाचे मोठे संकट ओढवले आहे. रुग्णांमध्ये कोरोना सोबतच इतरही गंभीर स्वरूपाच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांची प्रकृती गंभीर असते परिणामी त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. त्यानुसार डॉक्टरही रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याचा सल्ला देतात; मात्र सद्यस्थितीत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. अशातच गुरुवारी हाफकीनमार्फत केवळ दोनच व्हेंटीलेटरचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला, तरी रुग्णसंख्येच्या तुलनेत हे व्हेंटीलेटर पर्याप्त नाहीत. ऐनवेळी आवश्यक सुविधा न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. रूग्णवाढिचा वेग असाच वाढत राहिल्यास ही परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्ण संख्या वाढत असताना मर्यादित वैद्यकीय साधनांमुळे आरोग्य यंत्रणाही हतबल दिसुन येत आहे.

उर्वरीत व्हेंटीलेटरची प्रतीक्षाच
कोरोनाचा जिल्ह्यात शिरगाव होण्यापूर्वीच आरोग्य यंत्रणेने तयारीला सुरुवात केली होती. यामध्ये सेनिटायझर, मास्क सोबतच नवीन व्हेंटिलेटर खरेदी संदर्भातही प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र गत दोन महिन्यात जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या नऊशेपार  पोहोचली, तरी अद्याप व्हेंटिलेटर केवळ दोन व्हेंटिलेटर मिळाल्याची माहिती आहे. उर्वरित 22 व्हेंटिलेटर अद्यापही मिळाले नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The demand was 24 and got only two ventilators