काटेपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग; चार वक्रद्वार उघडले

मयुर जंगले, महान
Thursday, 13 August 2020

जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पात ९१.७ टक्के जलसाठा झाल्याने पाण्याची विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पातून दुसऱ्यांदा विसर्ग करण्याची वेळ आली आहे.

महान (जि.अकोला)  ः जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पात ९१.७ टक्के जलसाठा झाल्याने पाण्याची विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पातून दुसऱ्यांदा विसर्ग करण्याची वेळ आली आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा जल प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आज घडीला या प्रकल्पात ९१.७ टक्के जलसाठा असल्याने चार वक्रद्वार उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसात दुसऱ्यांदा या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे.

बुधवार (ता.१२) दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी धरणाचे चार वक्रद्वार ३० सेंटीमीटर पर्यंत उघडण्यात आले. त्यामधून ९६.४४ क्युमेक्स एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाचे गेट क्रमांक १, ५, ६,व १० उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सावध राहण्याचा इशारा काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाद्वारे देण्यात आला आहे.

पूर्ण क्षमतेने भरणार
वाशीम जिल्ह्यातील पावसाने काटेपूर्णा प्रकल्पात मोठयाप्रमाणात जलसंचय होत आहे. गतवर्षी हा प्रकल्प पूर्ण क्षमते भरण्यासाठी परतीच्या पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. यावर्षी जिल्ह्यातील वान प्रकल्पातील जलसाठा वाढत नसला तरी काटेपूर्णा प्रकल्प मात्र १०० टक्के जलसाठाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेला संततधार पाऊस व त्यामुळे प्रकल्पात सुरू असलेली पाण्याची आवक बघता लवकरच काटेपूर्णा प्रकल्प १०० टक्के भरण्याची शक्यता आहे.

पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाची व्यवस्था
महान येथील काटेपूर्णा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने अकोला शहराच्या पिण्याच्या पाण्यासोबतच खरीपातील सिंचनासाठीही प्रकल्पातून पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. खरीपात सिचंनासाठी काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यावर विसंबून असलेला शेतकरी सुखावला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discharge of water from Katepurna project in Akola; Four curved gates opened