esakal | जिल्हा परिषदेत खांदेपलटाची चर्चा!

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषदेत खांदेपलटाची चर्चा!

जिल्हा परिषदेत खांदेपलटाची चर्चा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीमधील अंतर्गत मतभेद चौहाट्यावर आले असून, पदाधिकाऱ्यांची खांदेपालट होऊन नवीन नेतृत्व जिल्हा परिषदेला मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. सदस्य व कार्यकर्त्यांनी काही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांविराेधात थेट ‘वंचित’च्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्याने आता वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत.

जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक २५ सदस्य संख्या असलेल्या वंचित बहुजन आघाडीने जानेवारी २०२० मध्ये सत्ता स्थापन केली होती. सत्ता स्थापनेपासूनच जिल्हा परिषदेतील कामकाजाबाबत कोणताही प्रभाव विद्यमान पदाधिकाऱ्यांना टाकता आला नाही. सभागृहातील कामकाज सांभळता येत नसल्याने विरोधी पक्ष सदस्य वारंवार सत्ताधाऱ्यांच्या कामकाजामध्ये अडथळे निर्माण करण्यात यशस्वी होत असल्याचे दिसून आले.

दुसरीकडे पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवरही कोणताच अंकूश राहिला नाही. एकमेव अनुभवी पदाधिकारी असलेले चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचे सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाले. अध्यक्षा, उपाध्यक्षा व सर्व सभापती तर पहिल्यांदाच खुर्चीत विराजमान झाले आहेत. त्यांना प्रशासन काय, हेही माहिती नसल्याने कामकाज चालविताना सत्ताधारी पक्षाचे गट नेते ज्ञानेश्वर सुलताने यांची प्रचंड कसरत हाेताना दिसत आहे.

त्यातच सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना पक्षातील कार्यकर्ते व पक्ष पदाधिकाऱ्यांनाही न्याय मिळवून देता येत नसल्याने सत्ता असूनही उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. त्यातूनच विद्यमान पदाधिकाऱ्यांविरुद्ध थेट पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर तक्रारींचा ओघ वाढत असल्याने नेतृत्व बदलाबाबत हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.

................................................

पदाधिकाऱ्यांऐवजी नातेवाईंचा हस्तक्षेप

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक स्वतः पदाधिकारी असल्याच्या तोऱ्यात वागून हस्तक्षेप करीत असल्यानेही पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. काही पदाधिकाऱ्यांचे मुलगा, पती, कुटुंबातील अन्य सदस्य यांचा जिल्हा परिषेदेमध्ये सातत्याने वावर असतो

..............................................

तक्रारींची घेणार गांभिर्याने दखल

वंचित बहुजन आघाडीच्या सर्कल मेळाव्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य व कार्यकर्त्यांनी जि.प. पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत रोष व्यक्त केला होता. या सर्व तक्रारींचे मूल्यमापन करून पक्षाचे नेते ॲड. बाळासाहेब योग्य तो निर्णय घेतील, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रा.धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले.

.............

राजीनामा की, जबाबदारी होणार निश्चित?

पक्ष संघटनेपेक्षा कुणीही मोठा नाही. कुणीही स्वतःला मालक समजून वागू नये. लोकांनी निवडून दिले आहेत, त्यांची कामे होत नसतील त्यांना काय उत्तर देणार? त्यामुळे तक्रारींचे गांभिर्य लक्षात घेवून राजीनामा घ्यायचा की जबाबदारी निश्चित करून योग्य काम करून घ्यायचे हे ठरविले जाणार आहे. अर्थातच अंतिम निर्णय हा ॲड. बाळासाहेबांचा असेल, असे डॉ. पुंडकर यांनी सांगितले.

संपादन - विवेक मेतकर