esakal | कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव, २५ हजार हेक्टरवरील कापूस संकटात
sakal

बोलून बातमी शोधा

cotton

कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव, २५ हजार हेक्टरवरील कापूस संकटात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि. बुलडाणा) : यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने लवकरच हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी १४ जूनपासून पेरणीला सुरुवात केली होती. पिकांसाठी आवश्यक पाऊस बरसत असल्याने सद्य स्थितीत पीक परिस्थिती उत्तम असली तरी कपाशी पिकावर आकस्मिक मर रोगाचा (disease on cotton) प्रादुर्भाव आढळून आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तालुका कृषी विभागाने कपाशीची पाहणी केली असून यंदा खामगाव (khamgaon of buldana) तालुक्यात २५ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली आहे. (disease on cotton in khamgaon of buldana)

हेही वाचा: यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान

गेल्या काही वर्षांपासून कधी कमी तर कधी जास्त पावसामुळे शेती करणे अवघड झाले आहे. निसर्गाच्या अनियमितपणाने शेतकरी नेहमीच संकटात आले आहेत. यावर्षी पावसाला जून महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यातच सुरुवात झाल्याने खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी १४ व १५ जूनपासून पेरणीस प्रारंभ केला. तालुक्यातील काही भागात पावसाचा पत्ता नसताना इतर ठिकाणी मात्र शेतकरी पेरणी करून बसला होता. गेल्या आठवड्यात सर्वत्र पाऊस बरसल्याने सद्यस्थितीत खामगाव तालुक्यात १०० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. तालुक्यात सर्वाधिक सोयाबीनचा ३५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरा झाला तर त्या खालोखाल २५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यासोबतच उडीद, मूग, तीळ, ज्वारी, मका व तूर पिकांची पेरणी झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत २७७ मिमी पावसाची नोंद असून, सद्य स्थितीत शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे.

पिकांची डवरणी, खते देणे, निंदण, तसेच रासायनिक औषधे व कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. तालुक्यातील ८० टक्के पीक परिस्थिती उत्तम असल्याची माहिती आहे. जवळपास एक महिन्याचा कालावधी पेरणीला झाला आहे. पीके चांगली असतानाच तालुक्यातील ढोरपगाव, काळेगाव, हिवरखेड या भागांसह इतरही ठिकाणी कपाशी पिकांवर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. मर रोगामुळे कपाशीची झाडे सुकून जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्यावेत्ता डॉ. उमाळे यांनी पुढाकार घेतला आहे. तर मर रोगाने प्रादुर्भाव झालेल्या कपाशीची पाहणी करून शेतकऱ्यांना उपाययोजना करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करीत आहे. सध्या पावसाचे पुनरागमन झाल्याने सोयाबीन व इतर पिकांची झपाट्याने वाढ होत आहे.

तालुक्यातील काही भागात कपाशी पीकावर आकस्मिक मर रोग आढळून आला आहे. मर रोगाची लक्षणे दिसताच २४ तासाच्या आत यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी पाण्यात ५० ग्रॅम ब्लु कॉपर, १५० ग्रॅम युरिया व १५० ग्रॅम पोटॅश यांचे मिश्रण करून फवारणी पंपाची नौजल काढून ट्रेचिंग करावे. तसेच झाडाच्या बुडाशी दोन्ही बाजूने पायाने दाबावे.
- गणेश गिरी, तालुका कृषी अधिकारी, खामगाव.
loading image