Akola : श्वानांवर होतोय विष प्रयोग! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dog

Akola : श्वानांवर होतोय विष प्रयोग!

अकोला : पेढे वा तत्सम अन्न पदार्थात विषारी औषध मिसळून भटक्या श्वानांना खाऊ घालून, श्वान मृत्यूच्या घटना घडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला असून, बाधीत श्वानांच्या उपचारासाठी प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात श्वानांना जाणीवपूर्वक पेढे वा तत्सम खाद्यपदार्थातून विषारी औषध कालवून खाऊ घातले जात आहे. असे श्वान लगेचच अस्वस्थ होतात व अत्यवस्थ होऊन मरण पावतात. अशा घटना डाबकी रोड, कौलखेड रोड, एमआयडीसी परिसर अशा भागांमध्ये दिसून आल्या असून, आतापर्यंत १४ ते १५ श्वान मरण पावले आहेत. याबाबत शहरातील प्राणीप्रेमी संघटनांनी या घटना निदर्शनास आणल्या आहेत.

प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे आवाहन

अशा प्रकारे कुठेही श्वान अत्यवस्थ वा अस्वस्थ अवस्थेत निदर्शनास आल्यास श्वानाच्या उपचारासाठी अकोला प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या ७३८५३५०७०१ या क्रमांकावर संपर्क करावा. अथवा पशुसंवर्धन विभागाच्या प्राणी दवाखान्यात श्वानास न्यावे, असे आवाहन प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीने केले आहे.

मुक्या प्राण्यांशी निर्दयतेने वागू नका

प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९६० चे कलम ११(३) तसेच भारतीय दंड संहिता कलम ४२८, ४२९ अन्वये, असे कृत्य करणाऱ्या व्यक्ती शिक्षेस पात्र असून, असे निर्दयतेचे कृत्य करून मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळू नये, असे आवाहनही प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीने केले आहे.

टॅग्स :AkolaDog