
NCP : गृहमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘तो’ नेता मोकाटच
अकोला : एका शिक्षण संस्थेतील आदिवासी महिलेला नियमबाह्यरित्या सेवेतून काढून टाकल्याबद्दल ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला संस्था अध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेता यांच्याविरोधात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतरही फरार आहे.
खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर विधिमंडळ परिसरात फिरताना दिसलेल्या या नेत्यावर कारवाईचे आदेश गृहमंत्र्यांनी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले होते.
कौलखेड परिसरातील खेताननगरात असलेल्या श्रीराम मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील एका आदिवासी शिक्षिकेला शाळेचे संस्थाचालक अध्यक्ष, मुख्याध्यापक यांच्याकडून नाहक त्रास देवून मानसिक झळ करण्यात येत असल्याची लक्षवेधी विधान परिषदेत आमश्या पाडवी यांनी लावली होती.
१८ वर्षांपासून शिक्षिका असलेल्या या महिलेच्या विरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणतेही आदेश दिले नव्हते. त्यानंतर हे प्रकरण विभागीय स्तरावर प्रलंबित असतानाच शिक्षिकेला शाळा समितीच्या अहवालावरून सेवेतून काढण्यात आले होते.
या प्रकरणात महिलेने खदान पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड व मुख्याध्यापकासह अन्य दोघांवर ऑट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतरही विधिमंडळाच्या परिसरात फिरताना आढळल्यामुळे गृहमंत्र्यांनी या नेत्याला अटक करण्यासंदर्भातील आदेश अकोला पोलिसांना दिले होते. आधी तर गुन्हा दाखल करण्यासाठीच विलंब केला आणि आता अटक करण्यासाठीही विलंब करून पोलिस या नेत्याला पाठिशी तर घालत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.