esakal | ऑक्सिजन अभावी रुग्णांचे श्‍वास टांगणीला

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजन अभावी रुग्णांचे श्‍वास टांगणीला
ऑक्सिजन अभावी रुग्णांचे श्‍वास टांगणीला
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : नाशिक येथील ऑक्सिजन गळतीच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच नवनवीन संकट येत असून, जालना प्रशासनाने देऊळगाव राजा व सिंदखेड राजा कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यास असमर्थता दर्शविल्याने मातृतीर्थ मतदारसंघातील कोवीड सेंटरमध्ये व्हेंटिलेटरवर असलेले कोरोना रुग्णांचे श्‍वास टांगणीला असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. कोविड सेंटरमध्ये जेमतेम ऑक्सिजन सिलिंडरचा साठा उपलब्ध असून प्रशासनाने सिलिंडर न पुरविल्यास अनेक रुग्णांचे श्वास ऑक्सिजन अभावी गुदमरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे वेळीच लक्ष देऊन कोविंड रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून गॅस सिलेंडरचा आवश्यक साठा तत्काळ उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.


नाशिक येथे गॅस गळतीमुळे 24 रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हेलावून गेला या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेणार्‍या तसेच अनैसर्गिक गॅस (व्हेंटिलेटर) वर असलेल्या रुग्णांसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न दैनिक सकाळ ने केला असता विदारक चित्र समोर आले आहे. येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये 38 रुग्ण ऑक्सीजनवर असून संत गाडगेबाबा हॉस्पिटलच्या कोवीड सेंटरमध्ये 18 व देऊळगाव राजा कोविड केअर सेंटर मध्ये 5 रुग्ण गॅस सिलिंडरवर असून सिंदखेडराजा तालुक्यातही अनेक कोरोना रुग्ण गॅसवर आहे. घाटाखाली सर्व तालुक्याकरिता खामगाव, अकोला येथून गॅस सिलिंडरचा पुरवठा होतो.

देऊळगाव राजा, सिंदखेड राजा तालुक्यासाठी जालना जवळ असल्याने जालना येथील गॅस प्लॅटवरून सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान जालना जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जिल्हा बाह्य कोविड सेंटरसाठी सिलिंडर आज पासून पुरविले जाणार नाही. तुम्ही पर्यायी व्यवस्था करून घ्या अशा निर्वाणीच्या सूचना देण्यात आल्या अशी माहिती मिळाली आहे. स्थानिक दोन्ही कोविड सेंटरमध्ये सुमारे 60 कोरोना रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर अत्यावश्यक असून नैसर्गिक श्वास पुरेसा मिळत नसल्याने त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात एकीकडे रॅमडिसीव्हर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला असला तरीही त्या इंजेक्शन पेक्षाही कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर अत्यावश्यक आहे.

कोविंड केअर सेंटरमध्ये दोन दिवस पुरेल एव्हढाच सिलिंडर साठा उपलब्ध आहे. शुक्रवार रात्री पर्यंत ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा उपलब्ध न झाल्यास ऑक्सिजन अभावी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी वेळीच पाऊल उचलण्याची गरज असून कोवीड रुग्णांच्या करिता पुरेसा ऑक्सिजन सिलिंडरचा साठा तत्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे.


ऑक्सिजन सिलिंडरसाठी बुलडाणा, खामगाव पेक्षा जालना येथील ऑक्सिजन प्लांट येथून सिलिंडर उपलब्ध करणे सोयीचे आहे. खामगाव, बुलडाणा, अकोला येथून सिलिंडर आणण्यासाठी एक दिवस जातो. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व जिल्हाधिकारी बुलडाणा यांना ऑक्सिजन सिलिंडर संदर्भात माहिती दिली असून जालना जिल्हाधिकारी यांच्याशी ते चर्चा करणार आहे.
- डॉ. योगेश कायंदे, संचालक, संत गाडगेबाबा कोविड केअर, देऊळगाव राजा.

संपादन - विवेक मेतकर