कोरोनाच्या लढाईत खर्चच-खर्च तरी वाचा कसा हरवतोय कोरोना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

कोरोना विषाणू संसर्गाविरुद्ध जिल्ह्याला विविध उपचार सुविधा व उपाययोजना करण्यासाठी तसेच आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून आपत्ती प्रतिसाद निधी व जिल्हा वार्षिक योजनेतून 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. त्यापैकी विविध यंत्रणांनी आतापर्यंत 8 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी खर्च केला आहे.

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाविरुद्ध जिल्ह्याला विविध उपचार सुविधा व उपाययोजना करण्यासाठी तसेच आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून आपत्ती प्रतिसाद निधी व जिल्हा वार्षिक योजनेतून 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. त्यापैकी विविध यंत्रणांनी आतापर्यंत 8 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी खर्च केला आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. सदर उपाययोजना व आरोग्य विषय कामांसाठी जिल्ह्याला आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत 3 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. हा निधी जिल्हा शल्य चिकित्सक, महानगरपालिका, जिल्हा पोलिस अधीक्षक, सर्व तहसिलदार व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या यंत्रणांना वितरीत करण्यात आला. त्यापैकी विविध यंत्रणांनी आतापर्यंत 8 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी खर्च केला आहे.

यंत्रणानिहाय खर्च झालेला निधी
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय 1 कोटी 5 लाख रुपये, महानगरपालिका 40 लाख रुपये,  जिल्हा पोलिस अधीक्षक 5 लाख रुपये, सर्व तहसीलदार यांनी मिळून 40 लाख रुपये,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांनी 20 लाख रुपये असा एकूण 2 कोटी 10 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. त्यातून विविध सुविधा व तातडीच्या उपाययोजना निर्माण करण्यात आल्या. या सर्व बाबी मदत व पुनर्वसनाशी निगडीत आहेत. या निधीतील एक कोटी 30 लाख रुपयांचा निधी अद्याप शिल्लक आहे.

डीपीसीतून सात कोटी खर्च
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2019-20 अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक  अकोला यांना औषधी, साधनसामुग्री, यंत्रसामुग्री, उपजिल्हा रुग्णालयांसाठी 1 कोटी 73 लाख 81 हजार रुपये, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना 3 कोटी 61 लाख 63 हजार रुपये तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना 1 कोटी 64 लाख 62 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता. सदर सर्व निधी म्हणजे सात कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

जीएमसीला पुन्हा दिले 20 लाख
आगामी आर्थिक वर्षासाठी (सन् 2020-21) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) यंत्रसामुग्री व साधनांच्या खरेदीसाठी 62 लाख 45 हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 20 लाख रुपये वितरीत करण्यात आले असून त्यातील सहा लाख रुपये खर्चही झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: expense on health equipment due to corona in akola