Measles Infection : गोवर संशयितांची संख्या पन्नासवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fifty measles infected people in akola health update doctor measles precautions

Measles Infection : गोवर संशयितांची संख्या पन्नासवर

अकोला : जिल्ह्यातील दोन रुग्णांचे नमूने गोवर पॉझिटिव्ह आढळले असले तरी संशयितांची संख्या ५३ आहे. संबंधित सर्व संशयितांचे अहवाल मुंबई येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. ५३ संशयितांपैकी ३८ महापालिका क्षेत्रातील तर १५ ग्रामीण भागातील आहेत. मुंबईत गोवर या आजाराचा उद्रेक झाल्याचं चित्र आहे. मुंबईतल्या काही भागांमध्ये लहान मुलांमध्ये गोवर पसरल्याने रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा गोवरचे रुग्ण वाढत असून अकोला जिल्ह्यात सुद्धा गोवरचे ५३ संशयित रुग्ण आढळले आहेत.

त्यामध्ये १५ ग्रामीण तर ३८ नमूने मनपा क्षेत्रातील आहेत. सदर रुग्णांचे नमूने मुंबईतील एनआयव्हीच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान दोन रुग्णांचे नमूने गोवर पॉझिटिव्ह आढळले असले तरी संशयित नमून्यांचे संख्या अधिक असल्याने प्रतीक्षेतील अहवालांनी गूढ वाढले आहे.

संक्रमण १४ दिवसांपर्यंत प्रभावी

गोवरचा संभाव्य धोका लक्षात घेता मनपाच्या आरोग्य विभागाने घरोघरी सर्वेक्षण सुरू केले. गोवरचे संक्रमण १४ दिवसांपर्यंत प्रभावी राहते. अशक्त आणि कुपोषित बालकांमध्ये हे संक्रमण वेगाने पसरण्याची शक्यता अधिक आहे. लक्षण दिसताच उपचार सुरू करणे गरजेचे आहे. घरगुती उपचारात वेळ घालवणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे कोणताही ताप हा गोवर असू शकतो असे आरोग्य विभागाकडून कळवण्यात आले आहे. दरम्यान नागरिकांनी न घाबरता योग्य वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन सुद्धा आरोग्य विभागाने केले आहे.

अशी आहेत गोवरची लक्षणे

अंगावर लाल पुरळ किंवा लाल रंगाचे रॅशेस येणे, या आजाराची प्रमुख लक्षण मानले जाते. सुरुवातीला मुलांना खोकला आणि नाकातून पाणी येणे, सर्दी ही लक्षण दिसतात. त्यासोबतच डोळे लाल होऊ शकतात. बालकांमध्ये अशक्तपणा जाणवतो. यापैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.