अकोला : जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७ पैसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kharif
अकोला : जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७ पैसे

अकोला : जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७ पैसे

अकोला : यावर्षी झालेला ढगफुटी सदृष्य पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असल्याने जिल्ह्यात खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. खरिपातील लागवडी याेग्य ९९० गावांचा यात समावेश आहे. यंदा पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे जिल्ह्यातून कोरडा दुष्काळ गायब झाला असला तरी ओल्या दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर असल्याच्या बाबीवर यानिमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे.(990 villages suitable for kharif cultivation)

हेही वाचा: इस्लामपूर नगरपालिकेची ३ जानेवारीची सभा रद्दचे निर्देश!

खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करत असतो. या पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशांच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे. हीच परंपरा मागील अनेक वर्षांपासून रूढ झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागते. दर वर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर होते. ऑक्टोबरमध्ये सुधारित नजरअंदाज तर डिसेंबर महिन्याच्या ३१ तारखेला अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. या पैसेवारीनंतर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते. ५० टक्क्यांच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे समीकरण आहे. जिल्ह्यात १०१२ गावे असून, त्यातील ९९० गावे खरीप पिकांची लागवडी याेग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या ९९० गावांमधील अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या पाहणीतून स्पष्ट झाले असून त्यावर शिक्कामोर्तब सुद्धा झाले आहे.

हेही वाचा: पुणे : मुलांच्या लसीकरणासाठी आता ४० केंद्र

यावर्षी झालेल्या नुकसानीवर दृष्टीक्षेप

जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी, ढगफुटी सदृष्य पावसामुळे दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे ९ हजार ३८.०७ हेक्टर वरील शेत जमीन खरडून गेली. हे नुकसान २१ ते २४ जुलै आणि ६ ते ९ सप्टेंबर या दाेन टप्प्यातील अतिवृष्टीमुळे झाले आहे. याव्यतिरिक्त ऑगस्ट महिन्यात सुद्धा सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.

जिल्ह्यात मंगळवारी २८ डिसेंबर रोजी दुपारच्या गारपीट झाली. त्यामुळे चार तालुक्यातील २५ हजार ९५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये हरबरा, गहू, तूर, कापूस व भाजीपाला पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. अकोला तालुक्यात १२ हजार ५४५, बार्शीटाकळीत १ हजार ७४, मूर्तिजापूरमध्ये २ हजार ६००, बाळापूरमध्ये ९ हजार ५७१ तर पातूर तालुक्यात १६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

हेही वाचा: हिंगोली येथील एनटीसीमध्ये पोलिसांच्या छाप्यात तीन लाख ५० हजाराचा गुटखा जप्त

अशी आहे पिकांची अंतिम पैसेवारी

तालुका गाव अंतिम

  • अकाेला १८१ ४७

  • अकाेट १८५ ४८

  • तेल्हारा १०६ ४७

  • बाळापूर १०३ ४७

  • पातूर ९४ ४८

  • मूर्तिजापूर १६४ ४८

  • बार्शीटाकळी १५७ ४७

  • एकूण ९९० ४७

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top