पावसाने उडविली दाणादान 

मनोज भिवगडे
शनिवार, 11 जुलै 2020

यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच अकोला शहरात सार्वत्रिक स्वरुपाचा मुसळधार पाऊस शुक्रवारी दुपारी कोसळला. तासाभराच्या या पावसाने सर्वत्र दाणादान उडविली. नाल्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहत होते तर सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले.

अकोला : यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच अकोला शहरात सार्वत्रिक स्वरुपाचा मुसळधार पाऊस शुक्रवारी दुपारी कोसळला. तासाभराच्या या पावसाने सर्वत्र दाणादान उडविली. नाल्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहत होते तर सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. 

 

पावसाळा सुरू होऊन सवा महिना झाला. तरीसुद्धा शहरासह जिल्ह्यात सार्वत्रिक पावस पडला नव्हता. कुठे मुसळधार तर कुठे कोरडे वारे असा अनुभव नागरिकांना येत होता. शुक्रवारी प्रथमच अकोला शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी 3 वाजताच्या सुमारास पडलेल्या या पावसाने शहरात अनेक भागात पाणी साचले. मोठ्या नाल्यांचे पाणी ओसंडून रस्त्यावर आल्याने नागरिकांना त्यातूनच ये-जा करावी लागत आहे. सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने काही घरांमध्ये पाणी शिरले होते. मनपाकडून नाले सफाईबाबत झालेल्या दिरंगाईमुळे अकोला शहरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

शेतांमध्ये पाणी 
शुक्रवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यात अनेक शेतात पाणी साचले. त्यामुळे नुकतेच उगवलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. विशेषतः कापूस, सोयाबीनच्या पिकांना याचा फटका बसला असला तरी काही भागात या पावसाने पिकांना जीवदानही मिळाले आहे. 

अकोला-अकोट रस्त्याने प्रवास करा जपून 
अकोट ः अकोला ते अकोट मार्गाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी अद्यापही कच्चा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याने वाहने चालविताना वाहनधारकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. ज्या ठिकाणी कच्चा रस्ता आहे, तेथे हळूहळू वाहने चालवावी लागत असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. दुचाकी वाहनधारकांना मात्र या रस्त्याने जाताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Have rain in Akola city, collapse drainage system