esakal | कोंबड्यांचा उष्मा‘घात’, कुक्कुटपालनासाठी वेळीच उपाययोजन गरजेचे
sakal

बोलून बातमी शोधा

कोंबड्यांचा उष्मा‘घात’, कुक्कुटपालनासाठी वेळीच उपाययोजन गरजेचे

कोंबड्यांचा उष्मा‘घात’, कुक्कुटपालनासाठी वेळीच उपाययोजन गरजेचे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोंबड्यांचे शारीरिक तापमान इतर पक्षी, प्राण्यांच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे वातावरणातील अधिक तापमान कोंबड्यांच्या उष्णाघातास कारणीभूत ठरते. सध्याही जिल्ह्यात पारा चढायला सुरुवात झाली असून, कमाल तापमान ४३ अंशापार गेले आहे. पुढील दिवसात पारा अजून चढण्याची शक्यता असून, कोंबड्यांच्या उष्माघाताचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी, कुक्कुटपालन व्यावसायिकांनी आतापासूनच संरक्षित उपाययोजन करण्याचा सल्ला स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या तज्ज्ञांनी दिला आहे.

शरीराची सामान्य देखभाल, वाढ व प्रजनन ही शरीरातील उष्णता वाढण्याची मुख्य कारणे आहेत. याबरोबरच पक्ष्याचे वजन, जात, वयोगट, खाद्याचे प्रमाण, खाद्याची गुणवत्ता, शरीरिक हालचाल हे घटकही ऊर्जा निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या शिवाय शेडमधील वायुवीजन, वातावरणातील आर्द्रता, तापमान इत्यादी घटकसुद्धा पक्ष्यांच्या शरीरातील उष्णतेवर परिणाम करतात. शरीरावरील दाट पिसांची रचना व स्वेद ग्रंथी नसल्यामुळे पक्षी इतर प्राण्यांच्या तुलनेत उष्माघातास सहज बळी पडतात. साधारणतः पक्ष्यांचे शारीरिक तापमान १०४ ते १०६ अंश फेरनाईट इतके असते. थंड वातावरणात ते ७३ अंश फेरनाईटपर्यंत तग धरतात. प्रमाणापेक्षा वाढलेले शारीरिक तापमान कमी करण्यासाठी पक्षी श्वसनाचा वापर करतात. मात्र, शारीरिक तापमानापेक्षा सभोवतालचे तापमान अधिक असल्यास त्यांना शारीरिक तापमान नियंत्रित करणे अवघड होते व ते उष्माघातस बळी पडत असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

उष्माघाताची लक्षणे

* पक्षी सुस्तावणे, पंख विस्फारून बसणे, धाप टाकणे.

* चक्कर येणे, खूप तहान लागणे, भूक मंदावणे व स्वजाती भक्षण.

* मोकळा द्रव उदर पोकळीत साचणे (असायटीस)

* रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे.

* अंड्याचे कवच पातळ होणे.

* प्रजनन क्षमता कमी होणे, वाढीचा दर खुंटणे.

* मूत्रविसर्जन वाढल्यामुळे इलेक्ट्रालाईटसची कमतरता भासणे.

उपाययोजना

* पक्ष्यांसाठी थंड पाण्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता करणे.

* शेडमध्ये पंखे, कुलर व फॉगर इत्यादी साधने वापरून वायुवीजन वाढविणे.

* शेडवरील पत्र्यावर गवताच्या पेंढ्याचे अच्छादन करणे.

* शेडमधील पक्ष्यांची गर्दी कमी करणे व प्रतिपक्षी लागणारी जागा वाढविणे.

* छपराव स्प्रिंकलर्स लावून शेडचे तापमान नियंत्रित करणे.

* आहारातून किंवा पाण्यातून जीवनसत्व ई व क चा पुरवठा करणे.

* पाण्यातून इलेक्ट्रोलाईटसचा पुरवठा करणे, त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

* खाद्यातून आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या अर्काच्या मिश्रणाचा पुरवठा करणे.

संपादन - विवेक मेतकर

loading image