वऱ्हाडात सातपुड्यालगत पावसाचा जोर; ‘काटेपूर्णा’तून विसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वऱ्हाडात सातपुड्यालगत पावसाचा जोर; ‘काटेपूर्णा’तून विसर्ग

वऱ्हाडात सातपुड्यालगत पावसाचा जोर; ‘काटेपूर्णा’तून विसर्ग

अकोला : सलग चौथ्या दिवशी संततधार पावसाने ठाण मांडलेले आहे. वऱ्हाडात प्रामुख्याने सातपुड्याला लागून असलेल्या तालुक्यांमध्ये तुलनेने पावसाचा जोर अधिक दिसून आला. अकोट, तेल्हारा, संग्रामपूर, जळगाव जामोद तसेच मलकापूर या तालुक्यांचा त्यात समावेश आहे. वाशीम जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प ९५ टक्के भरला आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारीनंतर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

या भागात चार दिवसांपासून पाऊस असल्याने सूर्यप्रकाश पडलेला नाही. सतत ढगाळ वातावरण तसेच अधून-मधून पावसाच्या सरी होत आहेत. या पावसामुळे पिकांना मोठा फायदा झाला आहे. जवळपास २० दिवसांचा खंड पडल्याने पिकांची स्थिती बिकट बनत चालली होती. अशातच मंगळवारपासून पाऊस सुरू झाल्याने फायदा झाला. या चार दिवसांत काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसानही झाले.

हेही वाचा: संभाजीराजे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? तातडीने अटक करा

पातूर, मेहकर तालुक्यात गुरुवारी अतिवृष्टीची नोंद झाली होती. लोणी मंडळात तर ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला असेल तर विमा कंपनीला तातडीने सूचना देण्याचे आदेश प्रशासनाने केले आहेत. शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंत घेतलेल्या पाऊस नोंदीनुसार वऱ्हाडातील २६ तालुक्यांमध्ये पावसाची नोंद आहे. मात्र, यात प्रामुख्याने अकोल्यातील अकोट, तेल्हारा, बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर या तालुक्यांमध्ये अधिक पाऊस नोंद झालेला आहे.

प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ

चार दिवसांतील पावसाचा शेतीप्रमाणेच प्रकल्पांनाही फायदा होत आहे. अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्प ९५ टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे दुपारी १ वाजताच्या सुमारास प्रकल्पाचे दोन वक्रद्वार उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. प्रकल्पात ८०.९५ दलघमी पाणी साठा झाला आहे. तर वान प्रकल्पात ५४.६९ दलघमी म्हणजेच ६६.७४ टक्के साठा झाला. काटेपूर्णा प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात गुरुवारी जोरदार पाऊस झाल्याने यातील साठा झपाट्याने वाढून ९४ टक्क्यांवर पोचला. परिणामी या प्रकल्पात ९५ टक्के पाणी साठविण्याबाबत प्रशासनाने निर्देश दिले असल्याने कुठल्याही क्षणी या प्रकल्पाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. वान प्रकल्पात सुद्धा सातपुडा पर्वतामधून मोठ्या प्रमाणात आवक होत असून झपाट्याने प्रकल्प भरत आहे. शुक्रवारी सकाळी ६६.७४ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला. पाण्याची आवक लक्षात घेता या प्रकल्पाचेही दरवाजे उघडून वान नदीद्वारे पाणी सोडण्याबाबत काठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: भाजप आमदाराच्या घोटाळ्यावर किरीट सोमय्या गप्प का?

अकोट तेल्हारा तालुक्यात पावसाचा जोर

अकोट तालुक्यात अकोट महसूल मंडळ २३.८, मुंडगाव १९, पणज १८.८, कुटासा १०, आसेगाव बाजार२३, अकोलखेड २१.५, तेल्हारा २१, माळेगाव बाजार २६.८, हिवरखेड ४०, अडगाव बुद्रूक २१.३, पाथर्ड १९.५, पंचगव्हाण १५.८

बुलडाणा जिल्हा : जळगाव जामोद २०, जामोद १९.८, पिंपळगाव काळे १३.३, वडशिंगी १७.३, आसलगाव १२.५, संग्रामपूर १६.३, सोनाळा २८.५, बावनबीर २४.३, पातुर्डा १७, कवठळ १७.३, मलकापूर १९, दाताळा १३.५, नरवेल ३४.५, धरणगाव २४.३ मिली.

Web Title: Heavy Rain Strong In Jalgaon Discharge Of Water From Katepurna Akola News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..