हवामान विभागाचे संकेत; विदर्भातील या जिल्ह्यांत आठवडाभर जोरदार पाऊस, हे आहे कारण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

सध्या महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय असून, मागच्या 24 तासात छत्तीसगड, पूर्व मध्यप्रदेश याठिकाणी तो सक्रिय होता आणि ओरिसा, झारखंड, बिहार येथे पोहतच आहे.

अकोला : अकोल्यासह वऱ्हाडात आर्द्रतेचा टक्का वाढला असून, पुढील काही दिवस सारखीच स्थिती राहणार आहे. त्यामुळे आठवडाभर वऱ्हाडात जोरदार पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

सध्या महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय असून, मागच्या 24 तासात छत्तीसगड, पूर्व मध्यप्रदेश याठिकाणी तो सक्रिय होता आणि ओरिसा, झारखंड, बिहार येथे पोहतच आहे. कोकण सोबतच मुंबई पासून चंद्रपूर पर्यंत सरळ रेषेत येणाऱ्या सर्व जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय राहील. मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भ विभागात तुरळक ते मध्यम स्वरूपात पाऊस उपस्थित राहील.

महत्त्वाची बातमी - जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात करत होते हे अवैध काम अन् गुलाबी पाण्याजवळच...

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर इत्यादी जिल्ह्यात राज्य आणि मध्यप्रदेश सीमा परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून, पुणे, सातारा, नगर, सोलापूर, इत्यादी जिल्ह्यात मध्यम स्वरूपात तर, काही ठिकाणी रात्री अतिवृष्टीची शक्यता आहे. राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये आर्द्रता 80 टक्क्यापर्यंत वाढलेली दिसून येत आहे. साधारणपणे 50 मिमी पेक्षा जास्त पाऊस झालेला असून, या आठवड्यात हीच परिस्थिती राहणार असल्याची शक्यता नागपूर येथील हवामान तज्ज्ञ संजय अप्तुरकर यांनी व्यक्त केली आहे.

वाऱ्याची दिशा
कोकण आणि लगतच्या परिसरात पश्चिम दिशेकडून, विदर्भ मराठवाडा विभागात नैऋत्येस राहण्याची शक्यता. गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि छत्तीसगड सीमा परिसरात ती उत्तर, उत्तर-पूर्व दिशेकडून राहण्याची शक्यता असून, गती सर्वत्र सामान्य म्हणजे ताशी 30 किमी पर्यंत राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain throughout the week at the varhad in akola, buldana and washim district