Holi 2023 : बंजारा समाजाची महिनाभर चालणारी अनोखी होळी! Holi 2023 Banjara community month-long unique Holi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 बंजारा समाज

Holi 2023 : बंजारा समाजाची महिनाभर चालणारी अनोखी होळी!

अकोला : होळी सर्वच समाजात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. बंजारा समाजात तर हा सण महिनाभर साजरा केला जातो. जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका तांडा येथे बंजारा समाजाने आजही ही परंपरा कायम राखून आहे.

दांडी पौर्णिमेपासून गुढीपाडव्यापर्यंत बंजारा समाज होळी साजरी करतो. बंजारा समाजात होळीचा सण अगदी दिवाळीसारखाच साजरा होतो, लोकगीतं हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे खास आकर्षण.

खरं तर होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते. या गीतांना ‘लेंगीगीत’ असेही म्हटले जाते. बंजारा समाजाच्या होळीत ‘पाल’, ‘गेर’, ‘फगवा’, ‘धुंड’ अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात. बंजारा समाजाचा संघर्ष, शिक्षणाचा महत्त्व, व्यसनमुक्ती किंवा मग वात्रटीका अशा स्वरुपात ही गाणी असतात.

बंजारा समाजाच्या होळीत पाल, गेर, फगवा अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात. या दिवशी फगवा मागणं हा महिलांचा जणू हक्कच. तो मिळवण्यासाठी महिला पुरूषांना काडीने मारतातही. हा संपूर्ण कार्यक्रम तांडा प्रमूख नाईकाच्या घरासमोर साजरा होतो.

अशी साजरी होते होळी!

दुसऱ्या दिवशी पितरांचं पूजन केलं जातं. त्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या शेवया बनवतात. बंजारा संस्कृती आणि परंपरेनुसार होळी पहाटे पेटवतात. लहान आणि मोठी अशा दोन होळ्या पेटवतात.

उपवर मुलं होळीसाठी लाकडं जमवतात...या उपवर मुलांना ''गेरीया'' असं म्हटलं जातं.. त्यानंतर गेरीया होळी भोवती प्रदक्षिणा घालून विहिरीवर होळीचा प्रसाद खातात. बंजारा समाजातली महिनाभर साजरी केली जाणारी ही होळी म्हणजे दिवाळीच म्हणावी लागेल.

टॅग्स :HoliAkolaSakalAkola ZP