खाटा तर वाढणार मात्र, मनुष्यबळाचे काय?, वॉर्डाची संख्याही वाढणार

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 19 June 2020

झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे सर्वोपचार रुग्णालयावरील ताण वाढला आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या ३२४ वर पोहोचली आहे. रुग्ण वाढीचा वेग पाहता सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे आणखी ७५ खाटा आरक्षीत करण्यात येणार असून, वॉर्डाची संख्याही वाढविण्यात येणार आहे. परंतु, हे सर्व नियोजन करताना रुग्णसेवेसाठी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे वास्तव आहे.

अकोला  ः झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे सर्वोपचार रुग्णालयावरील ताण वाढला आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या ३२४ वर पोहोचली आहे. रुग्ण वाढीचा वेग पाहता सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे आणखी ७५ खाटा आरक्षीत करण्यात येणार असून, वॉर्डाची संख्याही वाढविण्यात येणार आहे. परंतु, हे सर्व नियोजन करताना रुग्णसेवेसाठी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे वास्तव आहे.

परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर असले, तरी झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि दररोज जाणारे कोरोनाचे बळी यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच असून, उपलब्ध संसाधने कमी पडू लागली आहेत. ही परिस्थिती पाहता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे कोविड वॉर्डासाठी आणखी ७५ खाटा आरक्षीत करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये वॉर्ड क्रमांक १०, ११, २५ आणि २६ वाढविण्यात आले आणखी दोन वॉर्ड वाढण्याची शक्यता आहे. सध्या ४०० खाटा आरक्षीत असून, कोरोनाचे ३३१ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापूर्वीच नेत्र व त्वचा विभागातील प्रत्येकी २० खाटांचे दोन वार्ड कोरोनाच्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरक्षीत करण्यात आले होते.

मागणीकरूनही मनुष्यबळ मिळेना
कोविड वॉर्डात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सफाई कामगारांचीही कमी आहे. अशा परिस्थितीत वाढत्या रुग्णसंख्येमुळे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. कंत्राटी तत्वावर आरोग्य विभागातर्फे परिचारीकांची पद भरली जात असली, तरी अद्यापही सफाई कामगारांची पदे रिक्तच आहेत. यासाठी २१ मार्चपासून जिल्हाधिकाऱ्यांकडे आठ वेळा पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही त्याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याने अस्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: However, the number of wards will also increase akola marathi news