शंभर कोटीचा मामला, सरकारी तिजोरीतच थांबला; एकीकडे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना दुसरीकडे...

अनुप ताले
रविवार, 31 मे 2020

जिल्ह्यामध्ये तूर व हरभऱ्याची शासकीय खरेदी सुरुवीताला 1 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 15 एप्रिलपासून सात हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले. परंतु, या सर्वच केंद्रावर खरेदी प्रक्रिया एवढी संथ व उदासीनपणे राबविली जात आहे की, आतापर्यंत निम्म्याही तूर, हरभऱ्याची खरेदी झालेली नाही. सातही केंद्रावर जिल्हाभरातील 26 हजार 924 तूर उत्पादकांनी व 20 हजार 160 हरभरा उत्पादकांनी नोंदणी केली. मात्र त्यांचेपैकी केवळ 15 हजार 227 शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे या 15 हजार 227 शेतकऱ्यांचे चुकाऱ्याचे शंभर करोड रुपये शासनाच्याच तिजोरीत अडकून असून, अजूनही त्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. 

अकोला : जिल्ह्यात शासनाचे सात तूर, हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू आहेत. परंतु, खरेदी प्रक्रिया एवढी संथ आहे की, फेब्रुवारी पासून ते अजूनपर्यंत नोंदणी केलेल्या निम्म्याही शेतकऱ्यांकडून तूर, हरभऱ्याची खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर, हरभरा शेतकऱ्यांच्याच घरात पडून आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, एकीकडे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना दुसरीकडे, हमीभाव केंद्रांवर खरेदी केलेल्या तूर, हरभऱ्याचे शंभर कोटी रुपयांचे चुकारे अजूनपर्यंत रखडलेले आहेत.

जिल्ह्यामध्ये तूर व हरभऱ्याची शासकीय खरेदी सुरुवीताला 1 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 15 एप्रिलपासून सात हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले. परंतु, या सर्वच केंद्रावर खरेदी प्रक्रिया एवढी संथ व उदासीनपणे राबविली जात आहे की, आतापर्यंत निम्म्याही तूर, हरभऱ्याची खरेदी झालेली नाही. सातही केंद्रावर जिल्हाभरातील 26 हजार 924 तूर उत्पादकांनी नोंदणी केली.

मात्र त्यांचेपैकी केवळ 42 टक्के म्हणजे 11 हजार 370 शेतकऱ्यांकडून एक लाख 59 हजार 923 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असून, 15 हजार 554 शेतकऱ्यांची तूर खरेदी बाकी आहे. हरभऱ्याच्या बाबतीतही अशीच स्थिती असून, नोंदणी केलेल्या 20 हजार 160 हरभरा उत्पादकांपैकी केवळ 19 टक्के म्हणजे 3857 शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी करण्यात आली असून, 16 हजार 303 शेतकऱ्यांचा 70 हजार 538 क्विंटल हरभरा खरेदी करणे बाकी आहे.

आवश्यक वाचा - अरे बापरे! सर्वोष्ण शहरांच्या यादीत या शहराचे नाव; जणू काही जगातील उष्णतेचे केंद्र बनन्याकडे...

शंभर कोटीचे चुकारे रखडले
शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर 27 मे पर्यंत 92 कोटी 75 लाख 53 हजार 400 रुपयांची तूर खरेदी करण्यात आली. मात्र त्यांचेपैकी आतापर्यंत केवळ 24 कोटी 22 लाख रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले असून, 68 कोटी 53 लाख 53 हजार 400 रुपयांचे चुकारे अदा करणे बाकी आहे. हरभरा खरेदी संदर्भातही अशीच स्थिती असून, खरेदी केलेल्या हरभऱ्याच्या 34 कोटी 21 लाख 11 हजार 725 रुपयांच्या चुकाऱ्यांपैकी केवळ 2 कोटी 91 लाख रुपये अदा करण्यात आले असून, 31 कोटी 30 लाख 11 हजार 725 रुपयांचे चुकारे अदा करणे बाकी आहेत.

 

Image may contain: 4 people, people standing
 

शेतकरी जागर मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
तूर, हरभऱ्याचे शंभर कोटी रुपयांचे चुकारे आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे. संमती न घेता पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आल्याने हजारो शेतकरी सरकारी योजनेपासून वंचित राहाले आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला नाही, त्याना त्वरित लाभ मिळवून द्यावा व केंद्र पुरस्कृत पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा त्वरित लाभ देण्यात यावा, या मागण्यासह शेतकरी जागर मंचच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना शनिवारी (ता.30) निवेदन देण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर सुलताने, विजय देशमुख, प्रशांत गावंडे, रवि अरबट, दिलीप मोहोड, शेख अन्सार, गजानन हरणे, मंगेश मांगटे, संजय भाकरे, तेजराव भाकरे, क्रिष्णकांत वक्ते, आनंद वानखडे, राजू नाईक, सुरेश मांगटे, अमोल मांगटे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundred crore rupees of farmers were stuck