जुन, जुलै महिन्यात असा असेल पाऊस

करा पिकांचे नियोजन
जुन, जुलै महिन्यात असा असेल पाऊस

अकोला : यावर्षी मॉन्सून कालावधी ‘जून ते सप्टेंबर’ दरम्यान देशातील १० टक्के क्षेत्रावर अतिवृष्टी, १५ टक्के सामान्यपेक्षा अधिक, ६० टक्के वर सामान्य, १५ टक्के क्षेत्रावर सामान्यपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. दुष्काळग्रस्त क्षेत्र शून्य टक्के राहणार असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ हवामान अभ्यासक संस्थेने व्यक्त केला आहे.

देशपातळीवर मॉन्सूमध्ये ९०७ मिमी तर, महाराष्ट्रात ११७५ ते १२३३ मिमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात दक्षिण पुणे म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती तालुक्यात सरासरीच्या उणे १० टक्के तर, इतरत्र सर्व जिल्ह्यांमध्ये पाच टक्के अधिक पाऊस पडणार असल्याचे संकेत ‘स्कायमेट’ तसेच हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

जून मध्ये साधारण पाऊस १६० मिमी असतो तो, १७७ मिमीपर्यंत राहू शकतो. महाराष्ट्रात पूर्व विदर्भात (गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हा) सामान्यापेक्षा १० टक्के अधिक, इतर जिल्ह्यात (वऱ्हाड, खानदेश, मराठवाडा, कोंकण, पुणे विभाग) उणे १० टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जुलैमध्ये साधारण पाऊस २८५ मिमी असतो तो, २७७ मिमीपर्यंत राहू शकतो. महाराष्ट्रात कोंकण वगळता इतर जिल्ह्यांमध्ये सामान्यापेक्षा १० टक्के अधिक पाऊस बरसण्याची संभाव्यता आहे. नंदुरबार, पश्‍चिम नाशिक, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मात्र, पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.

या महिन्याचे सामान्य पर्जन्यमान २५६ मिमी आणि अपेक्षित २५८ मिमी आहे. महाराष्ट्रात जुलैची पुनरावृत्तीची शक्यता व्यक्त केली आहे. खानदेश, कोंकण, नाशिक जिल्ह्याचा पश्‍चिम/मध्य भाग या ठिकाणी उणे १० टक्के तर, मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद सोबत पुणे विभागातील सोलापूर, सांगली तर, विदर्भातील अकोला, बुलाडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, संपूर्ण नागपूर विभागात १० टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

देश पातळीवर सामान्य पर्जन्यमान १७० मिमी असून, यावर्षी ते १९७ मिमी पर्यंत राहू शकते. महाराष्ट्रात खानदेशमध्ये पाऊस सामान्यापेक्षा ५० टक्के अधिक पडणार. यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, उत्तर नाशिक सोबत अमरावती जिल्ह्यामधील मेळघाट आणि सातपुडा रांगांचा परिसर प्रामुख्याने येत आहे.

यंदा मान्सूनमध्ये दक्षिणेकडील सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमावर्ती क्षेत्र वगळून इतर जिल्ह्यांमध्ये सामान्य पेक्षा ५ टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ‘स्कायमेट’द्वारे व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार यावर्षी देशपातळीवर ९०७ मिमी तर, महाराष्ट्रात ११७५ ते १२५० मिमी पावसाची शक्यता आहे.
- संजय अप्तुरकर, कृषी हवामान तज्ज्ञ, नागपूर

या नुसार करा पिकांचे नियोजन
गत काही वर्षांपासून मान्सूनचा कालावधी जूनमध्ये उशिरा सुरू आणि सप्टेंबरमध्ये अधिक वृष्टी, असा स्थलांतरित होत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये नियमित पाऊस नसतो. या नजीकच्या काळात तो नियमित बरसत असल्याने खरीप पिकांचे विशेषता सोयाबीन, कापूस, पिकांचे अधिक नुकसान होताना दिसत आहे. त्यानुसार यावर्षी शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन, व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषी हवामान तज्ज्ञ संजय अप्तुरकर यांनी दिला आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com