esakal | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

balapur.jpg

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने पाच दिवस बाळापूर बंदचे आवाहन केले असून आज पहील्या दिवशी शहरात अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. या बंदला स्थानिक व्यापारी संघटनांनीही प्रतिसाद दिला आहे. 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि. अकोला) : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने पाच दिवस बाळापूर बंदचे आवाहन केले असून आज पहील्या दिवशी शहरात अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. या बंदला स्थानिक व्यापारी संघटनांनीही प्रतिसाद दिला आहे. 

क्लिक करा- अरे बापरे! एकाच दिवशी पाच कोरोना बळी; या जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 64 वर

बहुतांश परिसर कंटेन्मेंट झोन
बाळापूर शहर कोरोना हॉटस्पॉट बनले असून, दिवसेंदिवस शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, बाळापूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 38 वर जाऊन पोहोचली आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील बहुतांश परिसर कटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून, सर्व परिसर सील करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात तब्बल पाच दिवस संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून, त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी शहारत पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा- खुशखबर! प्लाझ्मा थेरपीसाठी तब्बल एवढ्या कोरोनामुक्तांची संमती; गंभीर कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचण्यास होणार मदत

समुह संसर्गाचा धोका नाकारता येत नाही
संपूर्ण शहर 25 जून पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. यामधून दवाखाने, औषधालये व दूध विक्रीला मुभा दिली आहे. तसेच शहरातील बँक आपल्या कार्यालयीन वेळेत सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी गोपीचंद पवार यांनी सांगितले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असून, समुह संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. या पृष्ठभूमीवर पालकमंत्र्यांच्या बैठकीत पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

त्यानुसार शनिवारी (ता.20) शहरातील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरीत सर्व दुकाने बंद होती. बहुतांश नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह घरातच बसून कोरोनाशी दोन हात करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. उपविभागीय अधिकारी रमेश पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, ठाणेदार नितीन शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोपीचंद पवार विशेष लक्ष ठेवून आहेत.