esakal | व्यापाऱ्यांची दुकाने बंद, मात्र निवडणुका घेण्याची तयारी सुरू ?

बोलून बातमी शोधा

व्यापाऱ्यांची दुकाने बंद, मात्र निवडणुका घेण्याची तयारी सुरू ?
व्यापाऱ्यांची दुकाने बंद, मात्र निवडणुका घेण्याची तयारी सुरू ?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिवरखेड (जि.अकोला) : कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी महाराष्ट्रासह अकोला जिल्ह्यात अनेक दिवसांपासून ब्रेक द चेन नावाने लॉकडाऊन सुरू असून मागील वर्षी सुद्धा हीच परिस्थिती कायम होती. आता महाराष्ट्र शासनाने पुन्हा 1 मे ते 15 मे असा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. या सर्व व्यापार बंदी मुळे किरकोळ, घाऊक, आणि मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडे पूर्णतः मोडले गेले असून अनेकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता जवळपास सर्वच प्रकारची दुकाने आणि व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत.

तर दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील ओबीसींच्या जागा रिक्त झाल्याने तेथे पुन्हा निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बोलले जाते. मतदानापूर्वी तयार होणाऱ्या प्रारुप मतदार याद्या प्रकाशित झालेल्या असून त्यावर आक्षेप आणि हरकती बोलावण्यात आले होते. प्रारूप मतदार यादीतील आक्षेप आणि हरकती निकाली काढल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रकाशित होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यापुढे निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

परंतु यानिमित्ताने एकीकडे लॉकडाउन तर दुसरीकडे निवडणुकपूर्व प्रक्रिया सुरू असल्याने फक्त व्यापाऱ्यांनी दुकाने उघडे ठेवल्यानेच कोरोना वाढतो का आणि निवडणुकीमुळे कोरोना वाढत नाही का? असा सहाजिक प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित होत आहे. संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजविला असताना मोठमोठे राजकीय पक्ष लक्षावधी लोकांच्या सभा घेण्यात व्यस्त होते. उपरोक्त सभांमध्ये कोरोना नियमांचे कोणत्याही प्रकारे पालन झालेले नाही. त्यामुळे कोरोना प्रचंड प्रमाणात वाढला. त्याला अनुसरून

दोन दिवसांपूर्वीच मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चांगलेच खडसावले आहे. आणि कोरोना संसर्गाला सर्वस्वी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे संतापजनक वक्तव्य न्यायालयाने केले होते.

त्यामुळे अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिक्त जागांचे मतदान जिल्ह्यातील लक्षावधी जनतेच्या जीवापेक्षाही महत्त्वाचे आहे का ? असा प्रश्न उभा राहणे सहाजिक आहे. निवडणुकीच्या तारखा जरी घोषित झालेल्या नसतील तरी अंतिम निवडणूक यादी प्रकाशित करणे म्हणजे लवकरच निवडणुकांची नांदी आहे असे निदर्शनास येत असून एकीकडे लॉकडाऊन लावून दुसरीकडे निवडणुका झाल्यास आधीच उपासमारीची वेळ येऊन ठेपलेल्या नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही. असा सूर जनतेच्या चर्चेतून उमटत आहे.

लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या आमचे नाभिक व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कठीण झाला असून निवडणुकीपेक्षा लोकांचा उदरनिर्वाह जास्त महत्त्वाचा असून निवडणूक घेण्यापूर्वी लोकांचे रोजगार व्यवसाय शासनाने पूर्ववत सुरू करण्याची परवानगी द्यावी.

प्रकाश खापरकर, नाभिक व्यावसायिक, हिवरखेड.

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठी अंतिम मतदार यादीचे काम पूर्णत्वास आले आहे. परंतु निवडणूकीचा कार्यक्रम अजून पर्यंत जाहीर झालेला नाही.

डॉ. संतोष येवलीकर, तहसीलदार तेल्हारा.

निवडणुकीमुळे कोरोना पसरतो हे अनेक राज्यातील निवडणुकांमुळे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावरील निवडणुका सुद्धा कोरोना नियंत्रणात येईपर्यंत घेऊ नये. अशी आमची मागणी आहे.

संदीप इंगळे, माजी सरपंच हिवरखेड.

संपादन - विवेक मेतकर