esakal | महाराष्ट्र बंदवरून आमदार राजेंद्र पाटणींचा सरकारवर हल्लाबोल IMaharashtra Bandh
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र बंदवरून आमदार राजेंद्र पाटणींचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र बंदवरून आमदार राजेंद्र पाटणींचा सरकारवर हल्लाबोल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या आविर्भावात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे ही ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. १०५० कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी केला.

वादळे, अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर अशा संकटात महाराष्ट्रातील शेतकरी व जनता त्रस्त असताना, केवळ मदतीच्या कोरड्या आश्वासनांपलीकडे सरकारने काहीही दिलेले नाही. गेल्या वर्षीच्या निसर्ग आणि या वर्षीच्या तोक्ते वादळात नुकसान झालेल्यांना सरकारने जाहीर केलेली मदतही अजूनपर्यंत पोहोचलेली नाही. अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेले महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही मदतीची वाट पाहात आहेत.

हेही वाचा: ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यभरात मोठा प्रतिसाद; अनेक ठिकाणी तणाव

शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहात आहे आणि ठाकरे सरकार उत्तर प्रदेशातील घटनांची काळजी दाखवत आहे. मंत्रिमंडळात लखीमपूर घटनेवर राजकारण केले जाते. हा केवळ राजकीय स्टंट आहे. काँग्रेसची खुशामत करण्यासाठी राज्यातील संकटग्रस्तांना वेठीस धरू नका, असा इशाराही आमदार पाटणी यांनी दिला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत लखीमपूर घटनाग्रस्तांना श्रद्धांजली वाहणाऱ्या ठाकरे सरकारला महाराष्ट्रातील संकटांमध्ये मृत्यू पावलेले शेतकरी, सामान्य जनता आठवली नाही का? त्यांच्यासाठी श्रद्धांजलीचे दोन शब्द सरकारने मंत्रिमंडळात का काढले नाहीत? असा सवाल आमदार पाटणी यांनी केला. राजकारण करून जनतेचे लक्ष समस्यांपासून दूर नेता येईल, पण त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाया थांबविता येणार नाहीत.

दररोज नव्या भ्रष्टाचाराचे दाखले समोर येत असल्याने महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून ठाकरे सरकारची होणारी नोंद पुसता येणार नाही. अगोदरच कोरोनाकाळात कंबरडे मोडलेल्या महाराष्ट्रात बंद पुकारून जनतेच्या हलाखीत या राजकारणामुळे भर पडणार आहे, असेही ते म्हणाले.

भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी बंदची नौटंकी

राज्यातील सत्ताधारी नेते, सनदी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची हजारो कोटींची प्रकरणे बाहेर येत आहेत. आयकर खात्याने अधिकृतपणे हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. जनतेस तोंड दाखवायला जागा न राहिलेले अनेकजण चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी पळापळ करत आहेत आणि नवी प्रकरणे बाहेर येऊ लागल्याने अनेकजण धास्तावले आहेत. स्वतःच्या भ्रष्टाचारावर आणि नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी लखीमपूर प्रकरण महाराष्ट्रात पेटवून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचा सरकारचा डाव आहे. सरकार राज्यातील जनतेसाठी काहीही करू शकत नाही, हे ठाकरे यांनी त्यांच्या नाकर्तेपणातून सिद्ध केले असल्याचे आमदार राजेंद्र पाटणी म्हणाले.

loading image
go to top