Akola : वऱ्हाडातील ११ हजार शेतकऱ्यांवर सुलतानी संकट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

electricity bills

Akola : वऱ्हाडातील ११ हजार शेतकऱ्यांवर सुलतानी संकट!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळात येणाऱ्या अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील मोठी रक्कम असलेल्या आणि मोठी थकबाकी असलेल्या सुमारे ११ हजार शेतकऱ्यावर आगामी काळात वीज कपातीची टांगती तलवार राहणार आहे. या थकबाकीदार शेतकऱ्यांनी मागील अनेक वर्षांपासून वीज देयकाचे पैसे न भरल्याचा महावितरणचा दावा आहे. तिन्ही जिल्ह्यातील कृषी पंपाची थकबाकी १७ कोटीच्या घरात आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसर, १० अश्व शक्ती पेक्षा जास्त जोड भार मंजूर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात एक हजार २०५ आहे. या शेतकऱ्यांकडे ११ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. आतापर्यंत यातील १२५ शेतकऱ्यांनी सहा लाख ५५ हजार रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. सोबतच पाच लाख रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २६ असून, त्यांच्याकडे एक कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी आहे.

उच्च दाब वीज वितरण प्रणाली योजनेत शेतकऱ्यांना मार्च २०१८ नंतर वीज पुरवठा करण्यात आला आहे. पण वीज जोडणी मिळाल्यावर शेतकऱ्यांनी वापरलेल्या बिलाचे पैसे भरले नसल्याचा दावाही महावितरणने केला आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत नऊ हजार ५४९ शेतकऱ्यांकडे चार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील ७७३ शेतकऱ्यांनी महावितरणकडे ३३ लाख ८३ हजाराचा भरणा महावितरणकडे केला आहे.

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

थकबाकी वसुलीसाठी आक्रमक भूमिका

वीज खरेदीसाठी महावितरणला रोजचे पैसे मोजावे लागतात. थकबाकी वाढल्याने महावितरण आर्थिक संकटात सापडली आहे. यामुळे महावितरणला थकबाकीदार वीज ग्राहकांना वापरलेल्या देयकाचे पैसे वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागते आहे. दारी आलेल्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यास दाद न देणाऱ्या वीज ग्राहकास योग्य कायदेशीर मार्गाचा वापर करून त्याचा वीज पुरवठा खंडित करण्या येत आहे. येत्या काळात थकबाकीदार शेतकऱ्यांच्या विरोधात महावितरण कडून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

ऐन रब्बीत ओढविणार संकट

महाविकरणने कृषी पंपाच्या थकबाकीसाठी आक्रमक भूमिका घेत थेट वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहणार आहे. रब्बीतील पिकांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र, वीज पुरवठाच नसेल तर या पाण्याचा शेतकऱ्यांना कोणताही उपयोग होणार नाही. त्यामुळे खरीपात अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बीत रब्बीत सुलतानी संकटाला सामोरे जावे जात आहे.

सत्ताधारी लोकप्रतिनिधी मूग गिळून

खरीपात संकाट सापडलेल्या शेतकऱ्यांच्या वीज कपातीचा इशारा महावितरणने दिला आहे. असे असतानाही राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार-खासदार मात्र मूग गिळून बसले असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

loading image
go to top