वादळ वाऱ्याचा महावितरणला फटका; तब्बल तीन कोटी 41 लाखांचे नुकसान; 112 गावांचा वीज पुरवठा...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

वादळ वाऱ्याने अनेकाचे संसार उद्‍ध्वस्त केले आहे. महावितरणची यंत्रणा उघड्यावरच असल्याने या अस्मानी संकटातून महावितरणही सुटले नाही.

अकोला : गेल्या तीन महिन्यात अनेकवेळा झालेल्या वादळ-वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका अकोला परिमंडळाला बसला आहे. यामध्ये आतापर्यत परिमंडळातील 1379 वीज खांब पडले आहे, तर 191 किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्या तुटल्या आहेत. परिणामी परिमंडळातील 112 गावांचा वीज पुरवठा बाधीत झाला होता. पण वेळोवेळी युध्दस्तरावरील प्रयत्नाने बाधित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.

वादळ वाऱ्याने अनेकाचे संसार उद्‍ध्वस्त केले आहे. महावितरणची यंत्रणा उघड्यावरच असल्याने या अस्मानी संकटातून महावितरणही सुटले नाही. गेल्या तीन महिन्यात परिमंडळात झालेल्या वादळ-वाऱ्याने परिमंडळातील अकोला जिल्हयात उच्चदाबाचे 180 आणि लघूदाबाचे 468 वीज खांब पडले होते. बुलडाणा जिल्ह्यात उच्चदाबाचे 189 आणि लघूदाबाचे 324 तर वाशिम जिल्ह्यात 68 उच्चदाबाचे आणि 150 लघुदाबाचे वीज खांब पडले होते. 

महत्त्वाची बातमी - अहो आश्‍चर्यम! लोकमान्य टिळकांच्या आधीपासूनच या गावात साजरा होतो सार्वजनिक गणेशोत्सव

याशिवाय पडलेल्या वीज खांबासोबत अकोला जिल्ह्यात 29 किमी लांबिच्या उच्चदाब वाहिन्या व 57 किमी लांबिच्या लघूदाब वाहिन्याही तुटल्या होत्या, तीन ठिकाणचे रोहीत्र कोसळले होते, 22 रोहित्रे ही फेल होऊन निकामी झाली होती, 137 ठिकाणचे रोहित्र बॉक्स खराब झाले होते. बुलडाणा जिल्ह्यात 32 किमी उच्चदाब व 68.8 किमी लघूदाब वाहिनी तुटली होती. याशिवाय 9 ठिकाणचे रोहीत्र कोसळले, 28 रोहित्रे ही निकामी झाली होती. 17 ठिकाणचे रोहित्र बॉक्स खराब झाले होते. वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर फक्त 4.3 किमी लांबिचीच लघूदाब वाहिनीच तुटली होती.

महावितरण कर्मचाऱ्यांची दमछाक
महावितरणची संपूर्ण यंत्रणा उघड्यावरच असल्याने वादळ- वाऱ्याच्या त्यावर परिणाम होतो. वादळ वाऱ्याच्या प्रकोपाने उद्‍ध्वस्त झालेली यंत्रणा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांची दमछाक झाली आहे. याशिवाय याचा अकोला -174, बुलडाणा-155 आणि वाशिम -11 लाख असे एकून 3 कोटी 41 लाखाचा मोठा आर्थिक फटकाही महावितरणला बसला आहे. वेळोवेळी प्रसंगानुरूप महावितरणच्या युध्दस्तरावरील प्रयत्नाने बाधीत झालेल्या 112 गावाचाही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

देखभाल दुरुस्तीसाठी वीज पुरवठा खंडित
पावसाळ्याला सुरूवात होणार आहे, त्यामुळे महावितरण संपूर्ण परिमंडळ स्तरावर देखभाल दुरूस्तीचे कामांना गती देण्यात आली आहे. देखभाल दुरूस्तीचे काम वीज पुरवठा खंडित केल्याशिवाय करता येत नाही. त्यामुळे या काळात ग्राहकांनी सहकार्य करावे करावे, असे आवाहन अकोला परिमंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL loses 3 crore rupees due to strong winds in akola region