esakal | ऑक्सिजन प्लांट रुग्णांसाठी ठरणार वरदान!

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजन प्लांट रुग्णांसाठी ठरणार वरदान!
ऑक्सिजन प्लांट रुग्णांसाठी ठरणार वरदान!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा संपुष्टात यावा व रुग्णांची परवड थांबावी यासाठी वंचितचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेवून त्यांना प्रेसर स्वींग ॲडसॉरप्शन (पीएसए) ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. Oxygen plant will be a boon for patients! सदर ऑक्सिजन प्लांटमधून कमी खर्चात व वेळेत रुग्णांना ऑक्सिजन मिळू शकते, असे सुद्धा ॲड. आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सदर ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यास मंजुरी दिली आहे, सदर प्लांट रुग्णांसाठी वरदान ठरेल, अशी माहिती वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी मंगळवारी (ता. ४) दिली.

जिल्हा परिषदेमार्फत सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसह पीएसए ऑक्सिजन प्लांट संदर्भात माहिती देण्यासाठी मंगळवारी (ता. ४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की पीएसए ऑक्सिजन प्लांटमुळे दररोज किमान २५ सिलेंडर रुग्णांना उपलब्ध होतील. त्यामुळे त्यापासून रुग्णांना सहजतेने ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल. प्लांट उभारण्याचे काम वेळेत सुरु झाल्यास महिनाभरातच रुग्णांना त्यापासून कृत्रिम ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल.

ॲड. आंबेडकरांच्या प्रस्तावावर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन अकोलेकरांना दिलासा दिला आहे, त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाचे जाहीर आभार सुद्धा यावेळी डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी मानले. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, जि.प. अध्यक्ष प्रतिभा भोजने, जि.प. उपाध्यक्ष सावित्री राठोड, सभापती पंजाबराव वडाळ, दिनकरजी खंडारे, पूर्व महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे, चंद्रशेखर पांडे गुरुजी, हिरासिंग राठोड, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे व इतरांची उपस्थिती होती.

ॲड. आंबेडकरांच्या जन्मदिनी रक्तदान व प्लाझ्मा दान शिबीर

यावर्षी वंचितचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन महाराष्ट्रभर विधायक पद्धतीने म्हणजे रक्तदान शिबीर व प्लाझ्मा दान शिबीर आयोजित करून साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान करावे, असे आवाहन राजेंद्र पातोडे यांनी यावेळी केले.

नोडल अधिकाऱ्यांकडे द्या दान!

जिल्हा परिषदेमार्फत जि.प. कर्मचारी भवनात कोविड १९ केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्याला सेवाभावी संस्थांनी दान देण्यासाठी आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी अकोला पंचायत समितीचे बीडीओ राहुल शेळके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रदीप वानखडे यांनी केले.

संपादन - विवेक मेतकर