
प्रकाश आंबेडकरांनी कंबर कसली? आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार! आज ऐतिहासिक परिषद
अकोला : ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासह ओबीसीच्या हिताचे व अत्यल्प समाजाचे हित जोपासण्याकरिता ऐतिहासीक परिषद २०२३ चे आयोजन आज (सोमवार) सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे करण्यात आले आहे. या परिषदेतून प्रकाश आंबेडकर आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
वाडेगाव येथील अवलिया अर्जुन महाराज संस्थान येथे आयोजित या परिषदेस मुख्य मार्गदर्शक तथा उद्घाटक ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल राऊत तर स्वागताध्यक्ष बालमुकुंद भिरड आहेत.
या परिषदेमध्ये पारीत होणाण्याच्या ऐतिहासीक ठरावाचे वाचक म्हणून ॲड. सप्तोष राहाटे आहे. या परिषदेला मार्गदर्शक म्हणून डॉ. अंजलीताई आंबेडकर देखील उपस्थित राहतील.
या परिषदेमध्ये शाहिर शितल साठे, सचिन माळी हे प्रबोधनपर गीत गाणार आहेत. ओबीसी व सत्यल्प समाजातील बंधू भगिनींनी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अकोला जिल्ह्यात स्थानिक राजकारणात वंचितचे मोठे वर्चस्व आहे. यापूर्वी विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघात वंचितचा आमदार होता. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे नितिन देशमुख आमदार आहेत. त्यामुळे हा मतदार संघ पुन्हा वंचिकडे खेचून आणण्यासाठी प्रकाश आंबेडकर प्रयत्न करणार आहेत. मात्र वंचितने उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यामुळे राजकीय पेच निर्माण होऊ शकतो.