
बनावटी गुटखा बनवणाऱ्या अड्ड्यावर छापा
अकोला - जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी (ता. १६) शिवणी येथील बनावटी गुटखा तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा मारला. यावेळी पोलिसांनी एका आरोपीला अटक करुन घटनास्थळावरून एक लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई दरम्यान एक आरोपी फरार झाला.
शिवणी येथील क्रांती नगरातील दिनेश शिरसाठ हा त्याच्या राहत्या घरात अवैधरित्या बनावटी गुटखा तयार करुन त्याची पॅकिंग करून विक्री करता आहे, अशी माहिती विशेष पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांना शनिवारी (ता. १६) मिळाली. त्यामुळे सदर ठिकाणी पोलिसांनी छापा मारला असता आरोपीच्या घरामध्ये बनावट गुटखा, सुगंधित तंबाखू, गुटखा बनवण्याच्या दोन मशीन, ज्यात तंबाखू सुपारी मिक्सर, तंबाखू टीन डब्बा पॅकिंग मशीन तसेच सुपारीचे खाली पॅकेट्स, गुटखा लेबलिंग पॅकिंग उपयोगी इतर साहित्य, वजन तराजू काटा असा एकूण १ लाख ५८ हजार रुपयांचा बनावटी गुटखा व इतर मुद्देमाल जप्त केला.
कारवाई दरम्यान आरोपी अभिमन्यू बाबुसा शिरसाठ (वय ६५, रा. बार्लिंगा) याला पोलिसांनी अटक केली. यावेळी दुसरा आरोपी दिनेश अभिमन्यू शिरसाठ (रा. बार्लिंगा, ह.मु. क्रांती नगर, शिवणी) हा फरार झाला. सदर दोन्ही आरोपींच्या विरोधात पोलिस स्टेशन एमआयडीसीमध्ये कलम ४२०, ३२८, १८८, ३४ व इतर कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक विलास पाटील व इतरांनी केली.
Web Title: Raid On Fake Gutkha Making Dens
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..